देश - विदेशपुणेमहाराष्ट्र

दिल्लीच्या कॅनॉट प्लेसवर – आषाढीचा रंगणार सोहळा

नवी दिल्ली : आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक, तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. या वारीचा महिमा संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळतो.

आषाढी वारीच्या दिवशी नवी दिल्लीमध्ये अशीच एक सांकेतिक वारी आयोजित करण्यात आली आहे. १० जुलै (रविवारी) रोजी दिल्ली येथे प्राचीन हनुमान मंदीर कॅनाॅट प्लेस ते विठ्ठल रूक्मिणी मंदिर रामकृष्णपुरम सेक्टर ६, अशी सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले आहे. कॅनॉट प्लेसवर आषाढीचा सोहळा रंगणार आहे. साधारणतः पहाटे ५.३० वाजता सर्व जण एकत्र जमणार असून टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठल-रुक्मिणीच्या नामाचा जयघोष करत करत सर्वजण सकाळी ८.३० पर्यंत विठ्ठल मंदिरात दर्शनाला जाणार आहेत.

यंदा दिल्लीमधील १३ जण आषाढी वारीमध्ये सामील झाले होते. अजूनही कित्येक लोकांनी वारीला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांना कामामुळे ९ दिवस वेळ काढणे शक्य झाले नाही. मराठी आहेत पण दिल्लीत राहतात, अशा सर्वांसाठी ही सांकेतिक वारी असणार आहे. आषाढी वारीला ७०० वर्षांची परंपरा आहे. हजार वारकरी पंढरपूरला फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आजच्या काळात आणखी वैभव प्राप्त झाले आहे.

तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच, पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दनस्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जात असतात. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये