ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शॉर्टसर्किटमुळे कंटेनरला आग; ३० टन फाटक्या नोटा जळून खाक

वर्धा : हैदराबादवरून मुझफ्फरनगर येथे चलनात नसलेल्या फाटक्या नोटा घेऊन जाम-नागपूर मार्गाने जाणाऱ्या कंटेनरला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कंटेनरमधील ३० टन नोटा जळून खाक झाल्या. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या सीमेजवळील आणि नागपूर जिल्ह्यातील बरबडी गावाजवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

भारतीय चलनात नसलेल्या नोटा यूपी १२ सीटी ५३२७ या क्रमांकाचा चौदाचाकी कंटेनर हैदराबाद येथून मुझफ्फरनगर येथे जात होता. आरबीआयने चलनात नसलेल्या नोटांचा लिलाव केला असता भंगार नोटा मुझफ्फरनगर येथील स्क्रॅप व्यावसायिकाने खरेदी केल्या होत्या. हैदराबादवरून जाम-नागपूर मार्गाने कंटेनर जात असताना वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील कोंढाळी बरबडी या गावाजवळ कंटेनर येताच शॉर्टसर्किटमुळे कंटेनरला भीषण आग लागली.

वाहनचालक जसवंतसिंग त्रिलोकसिंग (रा. मेरठ, उत्तर प्रदेश) व वाहक भोपाळ दाताराम या दोघांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करून जाम वाहतूक पोलिसांना माहिती दिली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊनही आग आटोक्यात आली नाही. यात कंटेनरमधील सर्व नोटांच्या स्क्रॅपची राख व कंटेनर जळून खाक झाला. या घटनेचा तपास सुरू आहे.

१०,५० आणि १०० च्या नोटा
फाटलेल्या दहा, पन्नास व शंभर रुपयांच्या नोटा बँकेत आल्याने त्या चलनात नसल्यामुळे आरबीआयने त्या नोटांचे दोन भाग केले होते. त्या नोटांचा लिलाव करण्यात आला असल्याने त्या सर्व नोटा स्क्रॅप व्यावसायिक घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये