“बाळासाहेबांना गुरूदक्षिणा म्हणून शिंदे-ठाकरेंनी एकत्र यावं”

मुंबई | Deepali Sayyad Has Gone To Meet CM Eknath Shinde- आज (बुधवार) शिवसेना नेत्या दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. तसंच दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दीपाली सय्यद यांनी भेटीसाठी निघताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, शिवसेनेचे दोन गट एकत्र करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच मी शिंदेंना भेटायला चालले आहे. आज गुरूपौर्णिमा आहे. शिंदेही बाळासाहेबांना अभिवादन करायला जाणार आहे आणि ठाकरेही. दोघांचे गुरू एकच आहेत. मग या चांगल्या दिवशी काहीतरी चांगली सुरूवात व्हायला हवी अशी माझी इच्छा आहे.
राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे. हे एकत्र येण्याचे संकेत म्हणता येतील का? याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, दौपदी मुर्मू यांना उद्धव साहेबांनी पाठिंबा दिला आहे. महिला राष्ट्रपती आहेत, चांगल्या गोष्टींना, चांगल्या व्यक्तींना उद्धव साहेबांनी पाठिंबा दिलाय. ही गोष्टही सारखीच आहे. दोन्ही गटांना एक व्हायला ही गोष्ट आली आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.
बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं. माझ्यासोबत सर्व शिवसैनिकांची ही अपेक्षा आहे, असं देखील दीपाली सय्यद म्हणाल्या.