पिंपरी चिंचवडसिटी अपडेट्स

पंतप्रधानांच्या आगमनामुळे देहूत बंदोबस्त

शासकीय यंत्रणा अलर्ट

परिसराला छावणीचे स्वरूप

भाविकांसाठी दर्शन राहणार बंद

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणार्‍या आगमनाने देहू नगरपंचायत प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. विविध सेवासुविधा व सुरक्षा कामांसाठी लगबग सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड : तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरातील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर देहू माळवाडीलगत लष्कराच्या मोकळ्या मैदानावर संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भव्य मंडप तयार करण्यात आले असून, सुमारे ४० हजार भाविक वारकर्‍यांसह नागरिकांना बसण्याची सुविधा करण्यात आली आहे.

श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी (दि.१४) पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव १४ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी तीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जूनला होणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आवार, शिळा मंदिर, सभास्थानी तयारी सुरू आहे. दुपारी एक ते दोन या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असून, मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकर्‍यांशी संवाद साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेलिपॅड सज्ज करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने येणार व जाणार आहे, त्या मार्गावर कामांची लगबग सुरू आहे. रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण करणे, पदपथ मोकळे करणे, रस्त्यांच्या दुतर्फा साईडपट्ट्यांवर मुरमीकरण करणे, पथदिवे बसवणे, रस्त्यांवर व इतरत्र लावलेले फलक, बॅनर, विद्युत पोलवरील जाहिरातींचे फलक काढणे, रस्त्यालगतचे बोर्ड हटविणे, बोर्ड काढणे, विद्युत तारा, विद्युत डीपी दुरुस्त करणे, बंद पथदिवे सुरू करणे, पथदिव्यांना अडथळा निर्माण करणार्‍या विद्युत तारांमध्ये धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, अतिक्रमण काढणे, स्वच्छता करणे, नाले साफसफाई करणे, भूमिगत मल:निस्सारण वाहिन्या स्वच्छ करणे आदी कामांची लगबग सुरू आहे.

पंतप्रधानांचा दौरा व आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिरामध्ये रंगरंगोटीचे काम सुरू आहे. इंद्रायणी नदीपात्रात पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे. इंद्रायणी नदी घाट परिसर दुरुस्ती काम सुरू आहे. संवाद सभेच्या ठिकाणी उपस्थित राहणार्‍या भाविक, वारकर्‍यांना दिंडीकर्‍यांना संस्थानच्या वतीने पास देण्याची सुविधा करण्यात आली आहे. मंदिरामध्ये सुसज्ज सी.सी. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणारे मंदिरातील थेट डिजिटल दर्शनसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना मुख्य मंदिराच्या बाहेरच मंदिरातील दर्शन होणार आहे.

सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह सर्व पोलिस व प्रशासनाची धावपळ सुरू आहे. देहू परिसरात घरोघरी तपासणी, परिसर छाननी करण्यात येत आहे. मुख्य मंदिर, तसेच सभामंडप परिसरावर शासकीय विविध अधिकारी, पदाधिकारी, आजी-माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यमंत्री यांचा पाहणी करण्यासाठी दौरा होत आहे. पोलिस बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये