आरोग्य

तणाव दूर करा… उत्साह वाढवा

तणाव हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे ‘तणाव’ होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला ‘तणाव’ असे म्हणतात. असमतोल निर्माण झाल्याने शरीराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. त्याचा परफॉर्मन्सवरदेखील नकारात्मक परिणाम होतो.

तर आता आपण तणाव दूर करण्यासाठी काही नामी उपाय बघू…
जर तुम्ही कामाच्या व्यापामुळे तणावात असाल तर आपल्या दिवसभराच्या कामाचे व्यवस्थापन नीट करा. एक टू डू लिस्ट बनवा आणि त्यानुसार सगळी कामे पूर्ण करा. याने आपल्या आवश्यक त्या कामांवर तुमचे लक्ष पण राहील आणि एक एक काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळून कामांचा योग्य तो निपटारा झाल्याने सकारात्मकतापण येईल.

ताणतणावामुळे बर्‍याचदा आत्मविश्वास डळमळीत होतो. जगण्यात रस वाटत नाही. काही करण्याची इच्छासुद्धा राहत नाही. अशा वेळी बाहेर जा आणि एका अशा सुहृदाला, मित्र, मैत्रिणीला भेटा, जो तुमचा आदर करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो एवढंच नाही, तर योग्य त्या वेळी तुमची प्रशंसासुद्धा करतो. याने तुम्ही मोटिव्हेट व्हाल आणि स्वतःला त्या दृष्टिकोनातून बघितले तर तुमच्या आतमधला आत्मविश्वासपण वाढण्यास मदत होईल.

तणावाला घालवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे सगळे काम बाजूला ठेवून फुरसतीच्या वेळात करण्यासारख्या काही अ‍ॅक्टिव्हिटीज करा, छंद जोपासा. पण या अ‍ॅक्टिव्हिटीज अशा असाव्यात, ज्यात तुमचा सक्रिय सहभाग असेल. म्हणजे टीव्ही बघणे, मोबाईल स्क्रोल करणे हे न करता अगदी डान्स, चित्रकला असे आपल्या आवडीचे छंद जोपासा आणि त्यात काही वेळ मन रमवून ताजेतवाने होऊन कामाला लागा.

ताणाशी योग्य प्रकारे जुळवून न घेता आल्यामुळे जीवनातील आनंद, स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी-जास्त प्रमाणात तणाव असतो. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतोच; त्याचबरोबर समाजातील बर्‍याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो, त्यामुळे तणाव दूर करून उत्साहात कसे राहता येईल, हे पाहिले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये