देवगिरी नदीला पूर, एक मुलगी गेली वाहून

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तिसगाव परिसरात असलेल्या देवगिरी नाल्याला पूर आला आहे. दरम्यान, कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन महिला अचानक आलेल्या पुरात अडकल्याचे समोर आले आहे. अचानक पूर आल्याने त्या जीव वाचवण्यासाठी लाकडी ओंडक्यावर बसल्या होत्या. मात्र यातील एक जण वाहून गेली आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आले.
महिलांना वाचवण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारीसुद्धा बुडाला होता, मात्र त्याला नागरिकांनी कसेबसे बाहेर काढत, रुग्णालयात दाखल केले आहे. नितु कालु जोगराणा (वय १७), हिरुबाई रघु जोगराणा (वय ५०) यांना वाचवण्यात आले असून, राधा नागरी सावडा (वय १४) वाहून गेली आहे. शहर आणि परिसरात अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. तर छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर आले आहे. तीन महिला पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले होते.