ताज्या बातम्यारणधुमाळी

देवेंद्र भुयार यांनी फेटाळले संजय राऊतांचे आरोप; म्हणाले, “ते काय ब्रम्हदेव…”

मुंबई | Devendra Bhuyar On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान न केलेल्यांची यादीच सांगितली आहे. या यादीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील समावेश आहे. यानंतर देवेंद्र भुयार यांनी संजय राऊतांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. एबीपी माझाशी बोलताना भुयार म्हणाले, “संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहतं, मी दिलं नाही हे यांना कसं माहित. मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे हे नंतर आले. किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळी मी सोबत होतो, शिवसेना नंतर आली.”

आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, “मी कुठलाही दगाफटका केलेली नाही. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वैयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरुन माझी नाराजी नाही. माझी नाराजी मुख्यमंत्र्यांवर होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही तर काय दाऊद समोर मांडायची का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे भुयार म्हणाले, यांच्याकडे पहिल्या पसंतीची मते नव्हती, जी ३३ मतं मिळाली ती आमची अपक्षांची होती, ती मतं काही अमेरिकेतून आली नव्हती. त्यांनी सांगितलेल्या सिक्वेंन्सनुसार मी मतदान केलं. मी भाजपकडे कसा जाईल. माझ्या विरोधात उभे असलेले बोंडे तिकडं उभे होते. मी त्यांच्याकडे कसा जाईल, असंही ते म्हणाले. संजय राऊत बेछूट बोलत आहे जे योग्य नाही, याबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी बोलणार आहे. काही आमदारांवर ईडीचं, यंत्रणांचं प्रेशर आहे. त्या दबावात त्यांनी भाजपला मतदान केलं असावं, असं देखील भुयार म्हणाले.  

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये