“हा पहिला विरोधी पक्ष असेल जो…”, देवेंद्र फडणवीस यांचं टीकास्त्र

नागपूर | Devendra Fadnavis – कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे (TET Scam) आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीमान्याची मागणी देखील केली आहे. आता आज (28 डिसेंबर) पुन्हा एकदा सत्तार यांना अधिवेशनात लक्ष्य करण्यात आलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
“राज्यातल्या लाखो तरूणांना बुडवणारा हा टीईटी घोटाळा महाविकास आघाडीच्या काळात झाला आहे. या ठिकाणी सनदी अधिकाऱ्यांपासून सगळे लोक त्या टीईटी घोटाळ्यात लिप्प होते. यांच्या काळात झालेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत गेले आहेत. या घोटाळ्यात मंत्रालयातले अधिकारी अटक झाले. आता या घोटाळ्यावरून आमचे सन्मानीय मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले जात आहेत. अब्दुल सत्तारांवर जो आरोप केला जातो आहे त्यात मी सांगेन त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. “आता एक नवीन पद्धत सुरू झाली आहे की कुठल्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करायचे आणि निघून जायचं. दिवसभर मीडियात तेच चालवत राहायचं. आम्ही या असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. त्या आरोपांना तसंच उत्तर आम्ही देऊ. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की हा पहिला विरोधी पक्ष असेल जो सत्ताकाळातल्या गोष्टी भ्रष्टाचार म्हणून बाहेर आणतो आहे. वरून आदेश आहे मला माहित आहे की बॉम्ब बॉम्ब म्हणत होते पण लवंगी फटाकाही सापडला नाही. मला सभात्याग करणाऱ्यांनी उत्तर द्यावं की टीईटी घोटाळा कसा झाला? लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न चुरडण्याचं काम कुणी केलं? अपात्र कंपन्यांना पात्र करण्याचं काम कुणी केलं? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.
“अब्दुल सत्तारांवर टीईटी घोटाळ्यावरून आरोप करण्यात येत आहेत. पण, त्यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही. याबाबत टीईटी आयुक्तांनी खुलासा केला आहे. कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करून निघून जायचं. मात्र, आम्ही सोडणार नाही, त्याला तसंच उत्तर देऊ,” असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.