राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ नेत्यानं दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

नाशिक | Dilip Dater – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता नाशिकमध्ये मनसे (MNS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी काही वैयक्तीक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचं पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवलं आहे.
नाशिक शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना मी न्याय देण्यात कमी पडत असल्यामुळे राजीनामा देत असल्याचं दातीर यांनी म्हटलं आहे. तसंच मी महाराष्ट्र सैनिक म्हणून कायम बांधील राहील असंही त्यांनी राजीनाम्यात नमूद केलं आहे.
दरम्यान, दिलीप दातीर यांनी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची नाशिक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दातीर यांनी राजीनामा दिल्यानं मनसेत एकच खळबळ उडाली आहे.