दुर्गम भागातील शाळांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे : अवघड क्षेत्रातील जि.प. प्रा. शाळा ठाकरवाडी (आगळंबे) येथील विद्यार्थ्यांना पुण्यातील बुधवार पेठ येथील साईनाथ मंडळ ट्रस्ट व भवानी पेठ येथील श्री शिवाजी मित्र मंडळाने शालेय साहित्याची भेट दिली. या भेटीने विद्यार्थी भारावलेे. विद्यार्थ्यांनी केलेल्या गणपती बाप्पाच्या जयघोषाने शाळा दुमदुमली.
दोन्ही गणेश मंडळांकडून दरवर्षी अवघड क्षेत्र व दुर्गम भागातील शाळांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. यंदा ठाकरवाडी येथील विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख किशोर भवाळकर यांच्यावतीने साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प. प्रा. शाळा आगळंबेचे मुख्याध्यापक मच्छिंंद्र हिलाळ, जि.प. प्रा. शाळा ठाकरवाडीच्या मुख्याध्यापिका मनीषा बुंदे, साईनाथ मित्र मंडळ व श्री शिवाजी मित्र मंडळाचे पदाधिकारी पीयूष शहा, भाऊ थोरात, गोविंद वरनदानी, अभिषेक मारणे, तेजस यजमल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास पायगुडे, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय साहित्यासाठी महिला मंच व सामाजिक कार्यकर्ते उमेश महांकाळे यांचेही सहकार्य लाभले.
आदिवासी समाजातील प्रथम व्यक्ती राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा आदर्श घेऊन आदिवासी, ठाकर व धनगरवाडी वस्तीतील विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचू शकतो. याकरिता शिक्षण, जिद्द व चिकाटी असणे आवश्यक असते, असे मत पीयूष शहा यांनी व्यक्त केले.