ट्रम्प यांच्यावर पीएम मोदींचा प्रभाव! पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येणार

आंतरराष्ट्रीय बँकर आणि राजकीय रणनीतीकार अंशुमन मिश्रा (Anshuman Mishra) यांनी खुलासा केला आहे की अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येतील. त्यांना ही माहिती स्वतः ट्रम्प यांनी दिली असल्याचे अंशुमन मिश्रा यांचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियासमवेत फ्लोरिडा येथील रिसॉर्टमध्ये होते. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अंशुमन मिश्रा हे मोजक्या लोकांपैकी एक होते; ज्यांना ट्रम्प यांच्या निवडणूक विजयाचे सेलिब्रेशनचे करण्यासाठी त्यांच्या कुटुंबासोबत मार-ए-लागो या ठिकाणी आमंत्रित केले होते. त्यांनी या सेलिब्रेशनचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
‘पीएम मोदींनी खरी गर्दी काय असते? हे दाखवून दिले’
अंशुमन मिश्रा यांनी सांगितले की, भारतातील पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवडणूक प्रचारसभांमुळे ट्रम्प खूप प्रभावित आहेत. पीएम मोदी यांच्या सभांना मोठी गर्दी होते. त्यांच्या या क्षमतेने ट्रम्प प्रभावित झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अंशुमन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प म्हणतात की, ‘मला वाटायचे की मीच मोठ्या प्रचारसभा आयोजित करतो. पण मी जेव्हा अहमदाबादला गेलो आणि तेव्हा पीएम मोदी यांनी मला खरी गर्दी काय असते? हे दाखवून दिले. ह्य़ुस्टन येथे आयोजित केलेल्या ‘हाउडी मोदी’! या कार्यक्रमाचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, तुम्ही लोक ज्याप्रकारे रॅली काढता, तसे आम्हाला स्वप्नातही जमणार नाही.
ट्रम्प- मोदी यांचे संबंध खूप चांगले, पण….
अंशुमन मिश्रा यांनी पुढे सांगितले की, ट्रम्प आणि पीएम मोदी यांचे संबंध खूप चांगले आहेत. पण तरीही ट्रम्प यांचे अमेरिकेतील आर्थिक हितांना प्राधान्य आहे. ज्यात व्यापार शुल्क लागू करण्याच्या शक्यतेचा समावेश आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही त्यांनी सर्व आयातीवर २० टक्के कर आणि चीनच्या वस्तूंवर ६० टक्के शुल्क लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मिश्रा म्हणाले “ते ‘अमेरिका फर्स्ट’बद्दल खरोखर गंभीर आहेत. कारण त्यांना माहित आहे की अमेरिका अडचणींचा सामना करत आहे.”
अमेरिका- भारत संबंधांचे एक “सुवर्ण युग”
दरम्यान, मिश्रा यांचे म्हणणे आहे की, ते अमेरिका आणि भारत द्विपक्षीय संबंधांबद्दल आशावादी आहेत. ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत येणे हे अमेरिका-भारत संबंधांसाठी एक “सुवर्ण युग” सुरु होऊ शकते. मिश्रा यांच्या मते, ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेले मजबूत संबंध ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
पुढच्या वर्षी भारत भेटीवर जाणार- ट्रम्प म्हणाले
“ट्रम्प संवाद साधताना म्हणाले, ‘मी भारतात जाणार आहे.’ दुसऱ्या दिवशी, मी त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबायीसोबत जेवण घेतले आणि यावेळी ते म्हणाले, ‘मी पीएम मोदी यांच्याशी बोललो आणि मला ते खूप आवडतात. मी पुढच्या वर्षी भारत भेटीवर जाणार आहे,” असे ट्रम्प म्हणाले असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.