पाण्याच्या टाकीसाठी शासनाचा ५० लाखांचा निधी

खा. सुप्रिया सुळे यांचा पुढाकार
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीत विद्यानगर परिसरातील रहिवाशांना पिण्याचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे जेजुरी पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी सांगितले.
जेजुरी शहराची लोकसंख्या ही अठरा हजार असून देवदर्शनसाठी येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. साधारणतः ३० हजार लोकसंख्येला जेजुरी पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज ३० लाख लिटर पाणी द्यावे लागते. जेजुरी परिसरात वसाहती वाढल्याने सर्वच भागात पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. जेजुरी शहरातील विद्यानगर भागात नियमित व पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने शासनाकडे विद्यानगर परिसरात नवीन पाण्याची टाकी व जलवाहिन्या टाकण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते, अशी माहिती नगरसेवक जयदीप बारभाई यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ठ्यपूर्ण योजनेअंतर्गत विद्यानगर भागात प्रभाग क्रमांक पाचमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे व जलवाहिन्या टाकणे या विकासकामासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पाचा खर्चाचा ९० टक्के हिस्सा राज्य शासनाचा व १० टक्के हिस्सा नगरपरिषदेचा राहणार आहे.