राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

शेळी, मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी

शशांक कांबळे
व्यवस्थापकीय संचालक,
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

शेळी, मेंढी पालन व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ठ्या दुर्बल असलेल्या घटकाकडून केला जात असला तरी या व्यवसायाकरिता लागणारे अल्प भांडवल, कमी मनुष्यबळ व कायमस्वरूपी उपलब्ध असलेली बाजारपेठ यामुळे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार, प्रगतीशील शेतकरी व व्यावसायिक या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत.
राज्यातील पशुधनाच्या एकूण मांस उत्पादनापैकी शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाचा ३७.९४ टक्के वाटा आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. तरुण सुशिक्षित रोजगारांस उत्पन्नवाढीचा शाश्वत स्रोत निर्माण झाला आहे.

राज्यात शेळी, मेंढी पालन व्यवसायास गती देण्यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे यात महत्त्वाचे योगदान आहे. या महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. पशुसंवर्धन विभागाचे ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र आणि १ शेळी, मेंढी पैदास प्रक्षेत्र १ एप्रिल १९८४ पासून आणि १ शेळी प्रक्षेत्र जुलै २०१० पासून महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
महामंडळाच्या विविध १० जिल्ह्यांत कार्यरत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रावर उस्मानाबादी शेळ्या, तसेच डेक्कनी, माडग्याळ जातींच्या मेंढ्यांचे पैदाशीकरिता संगोपन करण्यात येत आहे.

सुधारित जातींचे मेंढेनर व बोकड यांच्या पैदाशीसाठी वाटप महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रांवर डेक्कनी, संगमनेरी व माडग्याळ जातीच्या मेंढ्या, तसेच उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्यात येते. त्यापासून उत्पादित होणारे जातिवंत बोकड व मेंढनर व स्थानिक शेळ्यांची गुणवत्ता सुधारण्याकरिता पैदाशीसाठी शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येते.
मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण मेंढी व शेळी व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर, तसेच मुख्यालय गोखलेनगर पुणे येथे उपलब्ध आहे. प्रशिक्षण कालावधी तीन दिवसांचा आहे. राज्यातीत शेळ्या व मेंढ्यांच्या जाती, शेळ्यांचा निवारा, आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, करडांची निगा, दैनंदिन व्यवस्थापन, विमा, पैदास कार्यक्रमाचे नियोजन, पणन, शेळ्यांकरिता उपयुक्त चारा पिकांची लागवड, मूरघास तयार करण्याचे तंत्र याबाबत माहिती दिली जाते. लोकर विणकाम आणि लोकर कातरणी ग्रामीण भागातील लोकर व्यवसायास चालना मिळावी, तसेच स्वयंरोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने महामंडळामार्फत लोकर विणकाम प्रशिक्षण दिले जाते.

मेंढपाळ पारंपरिक पद्धतीने लोकर कातरणी करतात, त्यामुळे लोकरीचे बारीक तुकडे होऊन प्रतवारी कमी होते. त्यासाठी महामंडळामार्फत विजेवर चालणार्‍या यंत्राद्वारे मेंढ्यांची लोकर कातरणी रास्त दराने करून दिली जाते. याशिवाय महामंडळ मेंढपाळांमार्फत लोकर किफायतशीर भावाने खरेदी करून त्यापासून स्थानिक कारागिरांकडून लोकर वस्तू उत्पादन करून घेण्यात येते. महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्यामेंढ्यांकरिता उपयुक्त असलेले सुधारित जातींचे चारा बियाणे व संकरित गवतांचे थोंबे उत्पादित करून रास्त दरात उपलब्ध करून दिले जाते.

शेळी, मेंढी पालन व्यवसाय करण्यास इच्छुक असणार्‍या व्यक्तींना या व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात येते. महामंडळामार्फत शेळ्या, मेंढ्यांच्या स्पर्धा, मेंढपाळांचे व लोकर वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. महामंडळामार्फत बकरी ईदनिमित्त बोकड, तसेच मेंढेनर उपलब्ध व्हावेत, तसेच रोजी-मेंढी पालकांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावे, यासाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

शेळी-मेंढीपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर असा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम या व्यवसायाने केले आहे. शेतकरी करीत असलेल्या या व्यवसायाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत. लोकर विकास मंडळ, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, उपयुक्त वृक्षाची रोपवाटिका व प्रक्षेत्रावर झोला उत्पादन प्रकल्प, शुद्ध लोकरीपासून वस्तू उत्पादन, तसेच उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकर वस्तू विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. मेंढ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ राज्यातील डेक्कनी जातीच्या मेंढ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ पुढे आले आहे.

त्याच्या अर्थसाहाय्याने बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, जळगाव व सातारा जिल्ह्यांतील दोन लाख मेंढ्या आणि पुणे, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धुळे व नाशिक जिल्ह्यांतील तीन लाख मेंढ्या दत्तक घेण्यात आल्या आहेत. मेंढ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. लसीकरण, जंत प्रतिबंधक औषधोपचार, बाह्य कीटक निर्मूलन, आजारी मेंढ्यांना उपचार, क्षार औषधी आणि मेंढ्यांमध्ये अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी जातिवंत मेंढेनर पूर्ण अनुदानावर वाटप करण्यात येत आहेत. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या नावाने योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

ही योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील लाभार्थींसाठी लागू आहे. २० मेंढ्या १ मेंढेनर स्थायी, तसेच स्थलांतरित पद्धतीने गटवाटप, सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे वाटप, मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असे प्रत्येकी ७५ टक्के अनुदान, मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान, कुट्टी केलेल्या हिरव्या चार्‍यांचा मूरघास बनविण्यासाठी गासड्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान असे या योजनेचे स्वरूप आहे. या योजनेंतर्गत सर्व लाभधारकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

उपयुक्त वृक्षांची रोपवाटिका व प्रक्षेत्रावर झोला उत्पादन प्रकल्प कमी पर्जन्यमान असलेल्या भागात येणारे, तसेच शेळ्या, मेंढ्यांसाठी उपयुक्त असलेल्या चारा वृक्षाची रोपवाटिका सर्व प्रक्षेत्रांवर तयार करण्यात आली आहे. रोपवाटिकेतील रोपे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महामंडळातर्फे विविध शासकीय योजनेंतर्गत शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्याचेही काम सुरू आहे. शेळ्या, मेंढ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी, खाद्याची पौष्टिकता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्षेत्रांवर झोला उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. सर्व प्रक्षेत्रांवर गांडूळखत प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक मेंढ्यांपासून उपलब्ध होणार्‍या लोकरीस बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या लोकर विणकाम व्यवसायाचे जतन, तसेच प्रसार करण्याचे काम महामंडळामार्फत होत आहे. स्थानिक मेंढ्यांच्या लोकरीपासून लोकर वस्तू उत्पादनाचे कामही लोकर विणकाम व उपयोगिता केंद्रामार्फत करण्यात येते. महामंडळाच्या या सर्व प्रक्षेत्रांवर देशी लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या लोकर वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घोंगडी, जेन, घडीचे जेन, चादर, सतरंजी, गालिचा, लोकर उशी, शाल, मफलर, तसेच चेअर आसन, कारपेट या वस्तू विक्रीसाठी आहेत. महामंडळांतर्गत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत लोकर वस्तू विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून लोकर उत्पादने, तसेच शेळीचे दूध व पूरक उत्पादने या दालनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये