आदित्य ठाकरेंच्या ‘गद्दार’ शब्दावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई –Eknath Shinde Replies Aditya Thackerey : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट तयार झालेले आहेत. भाजप सोबत सत्तेत आसलेला शिंदे गट खरी शिवसेना आपली असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी अनेक प्रयत्न देखील शिंदे गटाकडून केले जात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाला भाजपचा पाठींबा असल्यामूळे त्यांचं पारडं जड दिसत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील शिवसेना मुळचीच खरी आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला आहे असा त्यांच्याकडून दावा केला जात आहे.
दरम्यान, माजी पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले आदित्य ठाकरे सध्या लोकांना विश्वासात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सध्या आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेवर असून लोकांना भेटत आहेत. आज सकाळी ते भिवंडी मध्ये होते त्यांनी भाषणात शिंदे गटातील नेते गद्दार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
भिवंडीतील शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी ‘आम्ही आमदारांवर अंधविश्वास ठेवला मात्र त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसले, त्यांनी पक्षाशी नाही तर माणुसकीशी गद्दारी केली आहे. त्यांच्या रक्तात शिवसेना कधी नव्हतीच.’ अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी भाषणादरम्यान केली होती.
शिंदे यांची प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या गद्दार शब्दावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्यांना काय बोलायचं ते बोलूद्या आम्ही आमचं काम करत आहोत. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्यासाठी कार्य करत आहोत. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेचा पाठींबा आहे. जनता आमच्या निर्णयावर खुश आहे. त्यामुळेच आमच्यासोबत आज ५० आमदार आणि १२ खासदार आलेले आहेत. अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.