‘आमचा विठ्ठल बाळासाहेब ठाकरे’! एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट
!['आमचा विठ्ठल बाळासाहेब ठाकरे'! एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट Uddhav Thackeray And Eknath Thackeray](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Uddhav-Thackeray-And-Eknath-Thackeray.jpg)
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री फेसबुक लाईव्ह करत त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. त्यानंतर औरंगाबदचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक पत्र लिहित आमदारांच्या भावना पत्रातून व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर तेच पत्र ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी ही आमदारांची भावना असल्याचं म्हटलं आहे.
आम्ही आतापर्यंत शिवसेनेत होतो, मात्र तुम्ही आम्हाला कधीही मोकळेपणाने भेटू दिलं नाही. तुमच्या बंगल्याची दारं सर्वसामान्यांसाठी कधीची खुली नव्हती. काल खऱ्या अर्थानं वर्षा बंगल्याची द्वारं सर्व सामान्यांसाठी उघडली गेली. लोकांमधून निवडून येणाऱ्या आणि विधान परिषद, राज्यसभेवरील बडव्यांची आम्हाला मनधरणी करावी लागत होती. अशी खंत आमदार संजय शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
औरंगाबादमधून एकनाथ शिंदे यांच्या गटात एकूण पाच आमदार गेले आहेत. त्यापैकी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे हे आमदार असून पहिल्यांदाच बंडखोर आमदाराचं उद्धव ठाकरेंच्या नावाने पाठवलेलं हे पत्र माध्यमांसमोर आलं आहे.