देश - विदेश

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या मते राज्यपाल ‘ना शोभेचे ना राजकीय’

नवी दिल्ली : मावळते उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या महिनाभरापूर्वीच राज्यपालांना राज्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की राज्यपाल कार्यालय हे ना शोभेचे स्थान किंंवा राजकीय पद नाही. सरकारने निधी उपलब्ध करून दिलेले कार्यक्रम राज्यांनी योग्यरीत्या राबवले आहेत की नाहीत, हे पाहणे राज्यपालांचे आद्य कर्तव्य आहे. राज्यपालांंनी आपल्या आचरणाने राज्य प्रशासनासमोर आदर्श ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. नायडूंच्या शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनावेळी विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर आणि प्रशासकांना नायडू संबोधित करीत होते.

राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, त्यांच्या पत्नी, गृहमंत्री अमित शाह, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर भोजनादरम्यान उपस्थित होते. राज्यपालांनी आपापल्या राज्यातील ‘शक्य तेवढ्या विद्यापीठांना’ भेट द्यावी आणि कुलपतींच्या भूमिकेत विद्यार्थी व कर्मचार्‍यांशी मनमोकळा संवाद साधावा, असेही नायडू म्हणाले. नायडू यांनी सुचवले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील क्षयरोग निर्मूलन आणि इतर आरोग्य जागृती उपक्रमांमध्ये राज्यपालदेखील महत्त्वाचे भागीदार बनू शकतात. लसीकरण कव्हजचे उदाहरण देऊन, नायडू म्हणाले, की लसीकरण प्रोत्साहनांचे सकारात्मक परिणाम झाले आणि भारतातला साथीच्या रोगांमुळे होणारा मृत्युदर कमी झाला. राज्यपालांनी विविध लसीकरण मोहिमांमध्ये सहभागी व्हावे आणि लोकांशी संवाद साधताना निरोगी आहाराच्या सवयींवर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. नायडू हे राज्यसभेचे अध्यक्षही आहेत.

आगामी अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत विदाई भेट म्हणून संसदेचे चांगले पावसाळी अधिवेशन घेण्याची मागणी केली. उद्यापासून सुरू होणार्‍या अधिवेशनासाठी विरोधकांनी १६ मुद्द्यांची यादी केली आहे. वर्ष २०१७ मध्ये भाजपने उपराष्ट्रपतिपदासाठी तत्कालीन कॅबिनेटमंत्री व्यंकय्या नायडू यांचे नाव पुढे केले होते. देशातील दुसर्‍या सर्वोच्च घटनात्मक पदासाठीची निवडणूक नायडू यांनी आरामात जिंकली होती. त्यांचा सध्याचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतिपदाचे सत्ताधारी एनडीएचे उमेदवार आहेत. संसदेतील सध्याच्या ७८० पैकी ३९४ खासदार एकट्या भाजपकडे आहेत, जे बहुमताच्या ३९० पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे धनखड ही निवडणूक सहज जिंकतील, असा विश्वास आहे. धनखड यांचा अर्ज दाखल.

दरम्यान, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर भाजपनेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जगदीप धनखड म्हणाले की, माझा जन्म एका शेतकर्‍याच्या घरात झाला, सहावीत शिकण्यासाठी ६ किमी चाललो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे शिक्षण घेतले आणि आज उमेदवारी दाखल केल्यानंतर एका सामान्य शेतकर्‍याचा मुलगा आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये