न्युट्रीशियन

हार्मोनचा असमतोल आणि आहारातील बदल

हार्मोन्स म्हणजे संप्रेरक किंवा याला आपण बोलीभाषेमध्ये केमिकल्स म्हणू. जे आपल्या शरीरात विविध भागांमध्ये स्रवत असतात. असे हार्मोन्स आपल्या शरीरात काही जटिल क्रिया पूर्ण करण्याचे काम करत असतात. या हार्मोन्सच्या लेवल वाढल्यामुळे अथवा कमी झाल्यास विपरीत परिणाम शरीरावर झालेले दिसून येतात. जसे, की सतत मूड स्विंग होणे, स्वभाव चिडचिडा होणे, एकाकीपणा वाटणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, स्त्रियांना चेहऱ्यावर व संपूर्ण अंगावर केस वाढणे. तेव्हा जाणून घेऊया काही महत्त्वाचे हार्मोन्स व त्यांचे कार्य :

१) ग्रोथ हार्मोन : हे आपली शरीराची उंची, वाढ, स्नायूंची मजबुती ठरवत असतात.
२) इन्सुलिन हार्मोन : रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे हे याचे मुख्य कार्य आहे.
३) थायरॉईड हार्मोन : गळ्याजवळील श्वासनलिकेच्यावर असणाऱ्या थायरॉईड ग्रंथींमधून ग्रंथी हे स्रवत असते. हाडांच्या व मेंदूच्या विकासासाठी हे हार्मोन गरजेचे असते.
४) इस्ट्रोजन हार्मोन : वयात येणाऱ्या मुली, स्त्रियांच्यामध्ये या हार्मोनचा आजकाल जास्त प्रमाणात अभाव जाणवतो. या हार्मोनचे काम हे मासिक पाळीचे संतुलन करणे हे असते. तसेच खाल्लेल्या अन्नातून व्हिटॅमिन डीचे शोषण करणे हे याचे महत्त्वाचे कार्य आहे.
५) टेस्टेस्टेराॅन-पुरुषांमध्ये प्रजनन इंद्रियांची वाढ करणे व त्याचे कार्य योग्यरीत्या चालू ठेवण्याचे काम हे हार्मोन करत असते. याच्या कमतरतेमुळे शारीरिक दुर्बलता, पुरुषांमध्ये नपुंसकत्व जाणवते.
६) कॉर्टिसोल हार्मोन : सतत येणाऱ्या मानसिक तणावामुळे काॅर्टिसोल हार्मोनची निर्मिती होते. शरीरातील वाढलेले कॉर्टिसोलचे प्रमाण हे तणावग्रस्त असल्याचे लक्षण मानले जाते.

हार्मोन इम्बॅलन्स होण्याची कारणे
1} अपुरी झोप 2} जंक फूडचे सेवन केल्यामुळे प्रोटीन व व्हिटॅमिनची कमतरता जाणवते. हार्मोनच्या निर्मितीसाठी प्रोटिन व पोषणयुक्त आहाराची गरज असते. त्यामुळे प्रोटिन्स, व्हिटॅमिन कमतरता असल्यास हार्मोन सिक्रिशन योग्य प्रमाणात होऊ शकत नाही. 3}वेळेवर जेवण न करणे 4}व्यायाम शारीरिक हालचालींची कमतरता असल्यास खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्त्वांचे शोषण होत नाही व हार्मोन इम्बॅलन्स होतो.
5} अनियमित जीवनशैली, अतिताणतणाव, चिंता
6} स्थूलत्व या कारणांवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल हार्मोन इम्बॅलन्स होणे हा एक आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला रोग आहे.
सकस आहार, रोजचा किमान अर्धा ते एक तासाचा व्यायाम, पुरेशी झोप, तणावमुक्त जीवन, मेडिटेशन यामुळे आपण सहज हार्मोन इम्बॅलन्सवर मात करू शकतो. यासाठी प्रथिनांनी व जीवनसत्वांनी परिपूर्ण असा आहार घ्यायला हवा. आपल्या आहारामध्ये डाळी, उसळी, मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा, अंडी, मासे, दही, दूध, ताक, लोणी, तूप यांचे सेवन करावे, तसेच हिरव्या पालेभाज्या व चोथायुक्त आहार घेतल्यास वजन नियंत्रण करून हार्मोन बॅलन्स करण्यास मदत होऊ शकते. नारळाचे तेल, जवस, चीया सीड्स यामध्ये ओमेगा थ्री असल्यामुळे शरीरामध्ये असलेली अतिरिक्त चरबी नियंत्रण करण्यास मदत करतात. दालचिनी, लवंग, मिरे यांसारखे मसाल्याचे पदार्थ यांचा काढा, तसेच ग्रीन टीच्या सेवनाने मेटाबोलिझम नियंत्रित करण्यास मदत होते व हार्मोन बॅलन्स करणे शक्य होते.

आहारतज्ज्ञ जान्हवी अक्कलकोटकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये