देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण आता…”

मुंबई | Devendra Fadnavis – सध्या अनेक राज्यांमध्ये शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून सुरू करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशमध्ये हिंदीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. अशातच आज (4 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातही अभियांत्रिकी (Engineering) आणि वैद्यकीय शिक्षण (Medical Education) मराठीतून करणार असल्याचं म्हटलं आहे. ते विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मातृभाषेचा गोडवा ओळखण्याचं काम केलं आहे. मोदीजींच्या लक्षात आलं की, भारतीय भाषा टीकवायच्या असतील तर त्यांना ज्ञान भाषांमध्ये रुपांतरीत करावं लागेल. जोपर्यंत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेवरील शिक्षण हे आपल्या मातृभाषेत होत नाही तोपर्यंत आमच्या भाषा वैश्विक भाषा होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात मोदींनी सर्व राज्यांना सूचना केल्या की, राज्यांनी आपल्या मातृभाषेत सर्व उच्च आणि तंत्रशिक्षणाचा सिलॅबस सुरू करा आणि त्यातून शिक्षण द्या. यामध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“लवकरच महाराष्ट्रात अभियांत्रिकी असो वैद्यकीय असो वा कोणतंही शिक्षण असो मराठीतून सुरू करणार आहोत. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होणार”, अशी घोषणाही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.