युरोपियन युनियनच्या राजदूतांनी केला मेट्रोतून प्रवास

पिंपरी : युरोपियन युनियनचे राजदूत युगो अस्तुतो यांची पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट देत मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. युगो अस्तुतो यांच्यासोबत मंत्री समुपदेशक, व्यापार आणि आर्थिक व्यवहार प्रमुख, रेनीटा भास्कर होत्या. त्यांनी फुगेवाडी स्थानक ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक व पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते संत तुकारामनगर स्थानक असा मेट्रोतून प्रवास केला.
पुणे मेट्रोसाठी युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेने भरीव अर्थसहाय्य केले आहे आणि त्यामुळेच हा प्रकल्प आतापर्यंत ७४ टक्के काम पूर्ण करणे शक्य झाले आहे. युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेचे पदाधिकारी हे पुणे मेट्रोचा नियमित आढावा घेण्यासाठी भेट देत असतात. युरोपियन समुदायाच्या राजदूतांनी सकाळी मेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यलयात पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. महामेट्रोचे अतुल गाडगीळ, संचालक (कार्य) व विनोद अग्रवाल, संचालक (ऑपरेशन) यांनी सद्यस्थितीतील मेट्रो प्रकल्पाची माहिती राजदूत युगो अस्तुतो यांना दिली.
युगो अस्तुतो यांनी पुणे मेट्रोच्या कामाबद्दल आणि विशेषतः मेट्रो स्थानकांच्या वैशिष्टपूर्ण संरचनेबाबत समाधान व्यक्त केले. युगो अस्तुतो, युरोपियन समुदायाचे भारतातील राजदूत म्हणाले, युरोपियन युनियन आणि भारत हवामानबदलाविरुद्धच्या लढाईत आणि हरित सार्वजनिक वाहतुकीच्या विकासासह शाश्वत शहरीकरणासाठी एकत्र काम करत आहेत.
युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (एखइ) ने भारतातील सहा शहरी रेल्वे प्रकल्पांमध्ये २.१ अब्ज युरोची गुंतवणूक केली आहे. पुणे हे यापैकी एक आहे आणि आज येथे येऊन मेट्रो मार्गावरील प्रगती माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहताना मला खूप आनंद होत आहे. युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेने पुणे मेट्रो रेल्वेच्या दोन नवीन मार्गांच्या बांधकामासाठी आणि १०२ आधुनिक मेट्रो गाड्या तयार करण्यासाठी ६०० दशलक्ष युरो गुंतविण्याचे वचन दिले आहे.