फडणवीस म्हणाले; मोदींनी अमेरिका, युरोपच्या नाकावर टिच्चून…
![फडणवीस म्हणाले; मोदींनी अमेरिका, युरोपच्या नाकावर टिच्चून... devendra fadnavis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/devendra-fadnavis.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युरोपीय देशांच्या नाकावर टिच्चून रशियाकडून तेल घेतलं, असं म्हणत भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. मोदी सरकारमध्ये आल्यानंतर प्रत्येक गरीबाला वाटू लागलं हे माझं सरकार आहे. सगळा देश माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असा व्यापक विचार करत मोदींनी काम केलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजपा नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. देशात संपूर्ण बहुमताचं सरकार आल्यावर एखादा नेता काय करू शकतो हे मोदींनी दाखवून दिलं. कितीही टीका झाली तरी त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. सामान्य माणसाचं सबलीकरण करणं, त्याला शक्ती देणं हे काम मोदींनी केलं. गरीबाला वाटू लागलं हे माझं सरकार आहे. माझे पंतप्रधान, माझ्यासाठी विचार करणारे पंतप्रधान, असं गरीबाला पहिल्यांदाच वाटलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी इतकं सिमीत नाही, तर सगळा देश माझं कुटुंब माझी जबाबदारी असा व्यापक विचार करत मोदींनी काम केलं असंही यावेळी फडणवीस म्हणाले,