“मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची प्रतिक्रिया
मुंबई | Father’s Reaction To Sushmita Sen’s Relationship – सध्या बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. यामध्ये आता सुष्मिता सेनचे वडील शुभीर सेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्याबाबत 2010 मध्ये चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावेळी दोघांनीही याबाबत मौन पाळणंच पसंत केलं. सुष्मिता सेनचे वडील शुभीर सेन हे निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत. नुकतंच त्यांना सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ‘मला याबाबत काहीही माहिती नाही’, असं सांगितलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सने सुष्मिता सेनच्या वडिलांशी याबद्दल विचारणा केली. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले, मला याबद्दल काहीच माहिती नाही. मी सकाळीच माझ्या मुलीशी बोललो, पण ती मला याबद्दल काहीच बोलली नाही. तुम्ही मला याबद्दल सांगितल्यानंतरच मी ते ट्विट पाहीलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला कळत नाही.
मला याबद्दल नंतर नक्की कळेल. पण मला आत्ता एवढचं सांगायचं आहे की मला अद्याप याबद्दल काहीही माहिती नाही. मला ललित मोदींबद्दल फार काही माहिती नाही. जर मला त्याबद्दल काही माहिती असती तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्यात लपवण्यासारखं काहीही नाही, असं शुभीर सेन म्हणाले.
“मी ललित मोदीला जावई म्हणून स्वीकारेन की नाही याचीही माहिती मी तुम्हाला त्याचवेळी देऊ शकेन. ज्यावेळी मला याबद्दल सर्व गोष्टी समजतील, त्यानंतर मी त्याचा स्वीकार करेन”, असंही सुष्मिता सेनच्या वडिलांनी सांगितलं आहे.