फिफाने केला भारताच्या सुनील छेत्रीचा गौरव

नवी दिल्ली : भारताकडून २००५ मध्ये पदार्पण केल्यापासून सुनील छेत्रीने १३१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या खेळाडूचा सन्मान करत, फिफाने त्याच्यावरील तीन भागांची मालिका कॅप्टन फॅन्टास्टिक जारी केली. फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था फिफाने भारतीय फुटबॉल संघाचा करिष्माई कर्णधार सुनील छेत्रीचा त्याच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर तीन भागांची मालिका जारी करून त्याचा गौरव केला.
फिफाने घोषणा केली, की ही तीन भागांची मालिका त्यांच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘फिफा प्लसवर उपलब्ध असेल. फिफाने आपल्या विश्वचषक हँडलवरून ट्विट केले, ‘तुम्हाला क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीबद्दल सर्व काही माहिती आहे, आता सक्रिय पुरुष खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूची कहाणी जाणून घ्या.
सुनील छेत्री-कॅप्टन फॅन्टास्टिक आता फिफा प्लसवर उपलब्ध आहे. भारताचा ३८ वर्षीय छेत्रीने ८४ गोलांसह सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (११७) आणि लिओनेल मेस्सी (९०) यांनी जास्त गोल केले आहेत.
पहिल्या भागाविषयी, फिफाने म्हटले पहिला भाग आपल्याला परत तिथं घेऊन जाईल जिथे त्याची सुरुवात झाली होती. वयाच्या २० व्या वर्षी भारतात पदार्पण करण्यापूर्वीची गोष्ट. जवळचे सोबती, प्रियजन आणि फुटबॉल सोबती त्याला लीडर व लिजन्ट म्हणतात.