Breaking News : अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मुख्यमंत्री समजूत काढण्यात ठरले यशस्वी
![Breaking News : अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मुख्यमंत्री समजूत काढण्यात ठरले यशस्वी manoj jarange 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/manoj-jarange-2-780x470.jpg)
जालना | Manoj Jarange Patil – आज (14 सप्टेंबर) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेण्यासाठी जालन्याकडे (Jalna) रवाना झाले होते. तर आता मुख्यमंत्री शिंदेंनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री जरांगेंची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे अखेर 17 व्या दिवशी जरांगेंनी त्यांचं उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरवाली गावात दाखल झाल्यानंतर त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलं. पण हे उपोषण त्यांनी मागे जरी घेतलं असलं तरीही त्यांचं साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंची भेटीची मागणी मान्य केली होती. त्यानुळे कालच ते जालन्यात जाणार होते पण काही कारणांमुळे त्यांना जाणं शक्य झालं नाही. त्यामुळे आज (14 सप्टेंबर) एकनाथ शिंदेंनी जरांगेंची भेट घेतली. यावेळी शिंदेंसोबत मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.