क्राईम

औंध पोलिस ठाण्याचे पाच जण निलंबित

सातारा ः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना पाच दरोडेखोर औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप सोडून पळाले होते, या प्रकरणातील कर्तव्य कसुरी संबंधित पोलिस कर्मचार्‍यांना भोवली आहे. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी निलंबित केले आहे. या थेट कारवाईमुळे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ९ मे रोजी पहाटे औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून पाच दरोडेखोर पळाले होते.

या घटनेमुळे सातारा जिल्ह्याच्या पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आपला तपास गतिमान करीत त्यातील तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले, मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्हा दौर्‍यावर होते, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार संतोष कोळी, हवालदार कुंडलिक कटरे, हवालदार नारायणी व हवालदार गलांडे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत.

गृहमंत्र्यांच्या जिल्हा दौर्‍यामध्ये संबंधित कर्मचार्‍यांच्या ढिलाईमुळे संबंधित दरोडेखोर कोठडी तोडून पळाले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या पाचही कर्मचार्‍यांच्यासंदर्भात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याचा अहवाल लवकरच अजयकुमार बन्सल यांना सादर केला जाणार आहे. पोलिस अधीक्षकांच्या कारवाईनंतर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात पोलिस चाणाक्षपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये