लसणाची फोडणी महागली! बाजारात लसणाचा तुटवडा, दरात मोठी वाढ

किरकोळ बाजारात लसणाचे किलोचे दर ४०० रुपयांवर पोहोचले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तर, वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब झाल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांना खमंग, स्वादिष्ट आणि रूचकर चव देणार्या लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने पुण्यातील स्थानिक बाजारपेठांमधील आवकही घटली आहे. बाजारात लसणाचा तुटवडा जाणवू लागला असून, मागणी जास्त असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले आहेत.
देशातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यात मोठ्या प्रमाणात लसणाचे उत्पादन घेतले जाते. मागील दोन वर्षे लसणाला दर न मिळाल्याने गुजरातमधील शेतकर्यांनी लसणाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले होते. परिणामी, येथील लागवड घटली होती. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये लसणाचा तुटवडा जाणवत आहे.
मार्केट यार्डातील बाजारात रोज ५ ते ७ गाड्यांची आवक होत आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात नवीन लसणाची आवक सुरू होईल. त्यानंतर वाढलेले दर कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यापारी समीर रायकर यांनी व्यक्त केला.
देशात लसणाचा तुटवडा जाणवत असतानाच काही प्रमाणात आफगाणिस्तानमधून देशात लसणाची आवक होत आहे. तेथून येणारा लसूण मुंबई, दिल्लीसह दक्षिण भारतातील राज्यात जात आहे. या लसणामुळे काही प्रमाणात दरवाढीला आळा बसला आहे, असेही व्यापार्यांकडून नमूद करण्यात आले.