अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

सर्जनाची घटस्थापना

घटस्थापना हे पंचमहाभुतांचे प्रतीक आहे. आपल्या देहात ही पंचमहाभुते वास करतात. सृजनाची निर्मिती करतात. मातीतून घट तयार होतो आणि मातीत विराम पावतो. मात्र विराम पावतो तो नव्याने निर्माण होण्यासाठी, हे लक्षात ठेवून नवरात्रोत्सव साजरा केला पाहिजे, आई भवानी नक्कीच आशीर्वाद देईल.

आज घटस्थापना होत आहे. आदिमाता, आदिशक्तीचा मानस सहवास आपल्याला यापुढे नऊ दिवस लाभणार आहे. भारतीय सण, उत्सवाला एक तर्कशास्त्र आहे. अध्यात्म आहे त्याचबरोबर विज्ञान, समाजकारणाचा विचारही आहे. गणपती बसतात भाद्रपदात. त्यापूर्वी श्रावणात व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवाचे दिवस सुरू होतात. या सगळ्याला एक क्रम आहे. पशु-पक्षी, वनस्पतींबद्दलचा आदर आहे. मात्र अति केले की हसू होते. त्याच प्रकारे आज या सण, उत्सवांची अवस्था झाली आहे.

पर्यावरणपूरक उत्सव करायला सांगण्यासाठी प्रदूषण वाढवणाऱ्या माध्यमांची मदत घ्यावी लागत आहे. घेतली जात आहे. तर मूळ मुद्दा आहे नवरात्रोत्सवाचा! स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा आणि तो केवळ उत्सव म्हणून नको तर मनात रुजावा आणि कृतीत उतरावा यासाठी. महिलांवर अत्याचार होतात. अजून त्यांच्या क्षमतांचा आदर केला जात नाही. अबला समजणे किंवा दुय्यम दर्जा देणे यांसारखी विचारसरणी अद्याप पुरुष मानसिकतेत आहे. वर्षानुवर्षे हे उत्सव होत असताना यामागचा हेतू आपण दिवसेंदिवस विसरत चाललो आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. सेक्स टू सेन्सेक्सच्या वर्तुळात सगळ्या प्रकारची माध्यमे अडकली आहेत. अशा वेळी तर सजग आणि विवेकी माध्यमांनी खूपच काळजीपूर्वक काम केले पाहिजे. याचे कारण हे सगळे विषय अखेरीस महिलाकेंद्रित विषयाशी निगडित आहेत आणि महिलांना सन्मान देण्याच्या अनुषंगाने आहेत.

घटस्थापना होत आहे आणि दोन वर्षांनी उत्साहाने सार्वजनिक पद्धतीनेही हा उत्सव साजरा होणार आहे. देशातली महागाई, बेरोजगारी, आरोग्यविषयक प्रश्न, सामाजिक सुरक्षितता, शोषण, भेदाभेद या सगळ्याचा थेट संबंध समाजातील महिलांशी येतो. पुरुष बेरोजगार असला तरी त्याच्या आईला किंवा पत्नीला त्या पुरुषापेक्षा जास्त मानसिक आणि नंतर आर्थिक त्रास होत असतो. पुण्यात निर्मला सीतारामन यांनी महागाईवर थेट भाष्य न करता त्याला गोलगोल उत्तर दिले. नियंत्रित महागाई अर्थशास्त्राला आवश्यक असली तरी सध्या असलेली महागाई केंद्र सरकारच्या नियंत्रणात नाही, याची कबुली त्यांनी दिली आहे. महागाईची झळ स्वयंपाकघरात काम करणाऱ्या बहुसंख्य महिलांना बसते, याचा विचार त्यांनी नवरात्रीपूर्वी झालेल्या या पत्रकारपरिषदेत खरोखर केला पाहिजे होता. नवा भारत उभा करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी पाहत आहेत.

त्याचे एक पाऊल म्हणून निर्मला सीतारामन यांना संरक्षणमंत्रीही केले होते. आज देशाच्या राष्ट्रपतिपदावर आदिवासी समाजातल्या स्वतःच्या ताकदीने आपली ओळख निर्माण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू विराजमान आहेत. देशाच्या अर्थकारणाचे चाक सीतारामन यांच्या हातात आहे. अशा वेळी केवळ दिखाव्यासाठी नाही, तर खरोखर नारीशक्तीचा सन्मान राहावा, असे काही केले पाहिजे. दिवसेंदिवस वाढत चाललेले महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी, थांबवण्यासाठी कायद्याचा वचक आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे पुरुषांची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू आहे, या विचारातून बाजूला करण्याचे शिक्षण, वैचारिक रुजवणूक केली पाहिजे. शाळा, महाविद्यालयात मोकळेपणाच्या सवलतीला स्वैराचारात रुपांतरित केले जात नाही ना हे पाहायला हवे. आजपासून अंबामातेची अनेक रुपे आपल्याला आठवतील, आपण त्यांचे स्मरण करू, मात्र मूलतः महिलांसाठी संवेदनशीलता जपणे आवश्यक झाले आहे. देवीचे अधिष्ठान नऊ दिवस असेल. या काळात सुख, शांती, सर्जनशीलता, विवेक, भयमुक्तता, संवेदनशीलतेचे बीजारोपण कसे होईल, त्यांना आलेल्या रोपांचे संगोपन कसे होतईल, ती बीजे अधिकाधिक कशी पेरली जातील, याचा कृतिशील विचार केला पाहिजे.

अनेक वेडगळ समजुती आणि भ्रामक विचारांची पेरणी समाजात गाजरगवतासारखी झाली आहे. ती काढून टाकली पाहिजे. आई भवानी पराक्रमी, निष्ठावान, आदर्श शिवाजीमहाराजांच्या पाठीशी उभी राहते तशी आपल्याही पाठीशी उभी राहावी, असे वाटत असेल तर शिवाजीमहाराजांनी दाखवलेल्या वाटेवर पावले उचलली पाहिजेत. घटस्थापना हे पंचमहाभुतांचे प्रतीक आहे. आपल्या देहात ही पंचमहाभुते वास करतात. सृजनाची निर्मिती करतात. मातीतून घट तयार होतो आणि मातीत विराम पावतो. मात्र विराम पावतो तो नव्याने निर्माण होण्यासाठी, हे लक्षात ठेवून नवरात्रोत्सव साजरा केला पाहिजे. आई भवानी नक्कीच आशीर्वाद देईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये