गावपातळीवर कृषी सेवा अंतर्गत देण्यात येणार बियाणे
![गावपातळीवर कृषी सेवा अंतर्गत देण्यात येणार बियाणे seeds](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/seeds-780x470.jpg)
पुणे : खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यंदा महसूलच्या पुणे विभागातून मागणी केलेल्या एक लाख ६८ हजार ९५० क्विटंल बियाण्यांपैकी ४९ हजार ४२७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
झाला आहे. गावपातळीवर कृषी सेवा केंद्राकडून हे बियाणे शेतकर्यांना देण्यात येत आहे.
दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने गेल्या एक ते दीड महिन्यापासून खरिपाची तयारी सुरू केली आहे. पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात खरिपाचे सरासरी १३ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १३ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे एक लाख ६८ हजार ९५० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. त्यास कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
खत कंपन्यानी शेतकर्यांच्या हिताचा विचार करून माती व पाणी परीक्षणासाठी शेतकर्याला प्रशिक्षित करावे. अनेक वर्ष शेतकर्याला हक्काचे मार्केट मिळाले नाही. केंद्र सरकारने भाजपाच्या एस.एम.पी प्रमाणेच एफआरपी सुध्दा बंधनकारक केल्यामुळे साखर कारखान्यांचा व शेतकर्यांचा फायदा झाला.
_वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा
सध्या विभागातील बहुतांशी भागात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. ज्या शेतकर्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशा शेतकर्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मे च्या पहिल्या आठवड्यापासून पूर्व मशागतीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. नांगरटी करण्यावर भर देत शेत पेरणीसाठी तयार केली आहे.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकर्यांना पेरणी करता येईल. शेतकर्यांना खतांच्या व बियाण्यांच्या बाबतीत काही अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने १५ हजार ९९७ क्विंटलने अधिक वाढ करीत जवळपास एक लाख ६८ हजार ९५० क्विंटल बियाण्याला मंजुरी दिली आहे. यामध्ये महाबीज एनएससीकडून २२ हजार २५४ क्विंटल, तर उर्वरित खासगी कंपन्यांकडून बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.