गुजरातमध्ये ‘आप’चे स्वप्न भंगलं, भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल! तर काँग्रेस वाताहात…

गांधीनगर : (Gujrat Assembly Election 2022) गुजरात निवडणुकीची घोषणा होण्यापुर्वीच आधीच ‘आप’ने प्रचाराचे नारळ फोडलं होतं. गुजरातच्या जनतेला अनेक आश्वासने देण्यात आली. एवढेच काय तर आपणच सत्तेत येणार असा दावा देखील ‘आप’कडून करण्यात आला. शिक्षण, रोजगार, महागाई, उद्योगधंदे, पाणी, रस्ते, आरोग्य यांसारख्या अनेक योजना लागू करण्याचे सांगण्यात आले. माध्यमांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाला सत्ता काबिज करता येईल, अशा बातम्या लावल्या त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढला.
दरम्यान, आप काँग्रेसची जागा घेणार असा अंदाज लावण्यात येत होते. मात्र, दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून हात आल्यानंतर हळुहळु चित्र स्पष्ट होत जात आहे. त्यामुळे आपचे गुजरातच्या सत्तेत येण्याचे स्वप्न भंगलं असल्याचे दिसून येत आहे. शिवाय काँग्रेसची जागा देखील घेता आली नाही. त्यांना तिसऱ्या स्थानावर रहावे लागले.
मात्र, भाजपने आपली विजयाची घौडदौड कायम ठेवत ऐतिहासिक विजय संपादन करण्याची येण्याची शक्यता आहे. मागील 2017 च्या विधानसभेत 99 जागेवर असलेल्या भाजपने आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 150 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मागील निवडणुकीत 77 जागा जिंकलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत मात्र केवळ 22 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर ‘आप’ला मागील निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता त्यांना 6 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे आपचे सत्तेचे स्वप्न भंगलं, भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे, तर काँग्रेसची पुन्हा एकदा वाताहात होताना दिसून येत आहे.