नृत्याद्वारे गुरुवंदना करीत साजरी केली गुरुपौर्णिमा
![नृत्याद्वारे गुरुवंदना करीत साजरी केली गुरुपौर्णिमा IMG 20220715 WA0112](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220715-WA0112-780x470.jpeg)
निगडी : नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या नृत्याद्वारे गुरुवंदना केली. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वतः नृत्यरचना साकारली होती. हा कार्यक्रम निगडी येथे पार पडला. यावेळी नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांनी गुरू पं. बिरजू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गुरू डॉ.पं. नंदकिशोर यांचे पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन केले. यावेळी सर्व आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कथक नृत्यातील विविध प्रकार तत्कार, आमद, तोडे-तुकडे, परण, गतनिकास, कवित्त, लडी याशिवाय गुरुवंदना, दशावतार, अर्धांग इ.सादर केले. कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अखेरीस स्वत: डॉ.पं.नंदकिशोर यांनी कथकनृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी नामदेवांचा अभंग ’कानडा राजा पंढरीचा’ यावर कथकनृत्य सादर केले. तसेच पं.बिरजू महाराज यांनी शिकविलेल्या सुंदर बंदिशी सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रमास साथसंगत तबला- संतोष साळवे, यश त्रिशरन, पखवाज- पवन झोडगे, हार्मोनियम व गायन- हरिभाऊ असतकर, अक्षय येंडे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन गार्गी राणे, श्रद्धा रास्ते यांनी केले.