सुखाचा चहा…!
![सुखाचा चहा...! tea](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/tea--780x470.jpg)
रस्त्यातच त्याला पावसानं गाठलं… आधीच सकाळपासून वैतागलेला तो… त्रागा करत त्यानं गाडी बाजूला घेतली… रस्ता तसा रोजचा परिचयाचा. पण कधी थांबावं लागलं नव्हतं… या सहा महिन्यांत पहिल्यांदा तो थांबला… पत्र्याच्या शेडखाली छोटीशी चहाची टपरी होती… तसंही आज सकाळच्या घटनेमुळं. चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं… हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता… टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं… ते मूल पत्र्यावरून पडणार्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं… मध्येच ओला हात आईबाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ ते दोघं हसून बघत होते… त्यानं चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला… एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला… त्याचं त्यालाच छान वाटलं… समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागं उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर चिंब पावसात धूसर होऊन. मजा करत उभे असलेले दिसले. हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला… बायकोचाच!
त्यानं कट केला… सकाळपासून हा पाचवा फोन तिचा. काहीतरी चुका करीत राहते आणि आपला मूड घालवते… लग्नाला अजून चार महिने नाही झाले. पण बोअर झालं हे सहजीवन, या भावनेनं त्यानं फोन कट केला… तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला… आणि तितक्यात त्या बाईकडून काही ग्लास. हातून सुटले आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला… ते मूल पाणी खेळताना क्षणभर थबकलं… तर त्या माणसानं हातानं आणि मानेनंच इशारा केला त्याला… ‘काही नाही खेळ तू…’ आणि तो काचा भरू लागला… तिनं आवाजाच्या दिशेने बघून. हात जोडून चुकीची माफी मागितली… तर त्याने फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला… एकूण चार-पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य… पण तो माणूस शांत होता…! आता याची बेचैनी अजून वाढली… याला सकाळचा प्रसंग आठवला… आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला. तर आपण किती चिडलो, बोललो तिला… पण ती शांत होती…
या वातावरणासारखी आणि आपण या चहासारखं गरम…! शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या… आपलं तर फारसं नुकसानही नव्हतं… पण आपण किती रिअॅक्ट झालो… त्यामुळं दिवसभर आपला मूडही खराब होता… आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला…! खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला या अनुभवातून… तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला… वीसची नोट देताच चहावाला म्हणाला, सर सुट्टे नाही माझ्याकडे १० रुपये द्यायला… तुमच्याकडे असतील तर बघा… त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे… चॉकलेट देऊ? चहावाला म्हणाला. त्यावर हसून याने नकार दिला आणि म्हणाला, असू द्या तुम्हाला… नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिलीत… ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात. मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरनं…! चहावाला हसून म्हणाला… तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करतो. कधीतरी चूक होणारच…
आपल्याकडूनही होते, फक्त आपल्याला रागावणारं कोणी नसतं… आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर असं रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी…? आयुष्य क्षणभंगुर आहे… होत्याचं नव्हतं कधीही होऊ शकतं… आता हिलाच बघा ना… लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि एकाएकी दृष्टी गेली… डॉक्टर म्हणाले, ‘येईल दृष्टी परत… पण कधी ते नक्की नाही’… खूप वाईट वाटलं… माझी चिडचिड होत होती… एक दिवस तिनं माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली; म्हणाली, ‘आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा…!’ मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे… त्या दिवसापासून ठरवलं, कितीही नुकसान झालं तरी तिला रागवायचं नाही…