हत्ती गणपती मंडळ, ‘रसिकाश्रय’चा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात उपक्रम

पुणे : प्रधानमंत्री अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील १५६ पूरग्रस्त गावांना मदत देण्यासाठी अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ आणि रसिकाश्रय संस्थेने ‘एक हात मदतीचा’ उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शाम मानकर यांनी राष्ट्रसंचारशी बोलताना दिली. दै. राष्ट्रसंचार कार्यालयाला शाम मानकर यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रसंचारचे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे यांनी त्यांचे स्वागत केले. यवतमाळ जिल्ह्यातील १५६ गावे अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे आठ दिवस पाण्याखाली होती. गावांची पार दुर्दशा झाली. यवतमाळमधील रसिकाश्रय संस्थेचे नितीन पवार यांनी गावांची कहाणी सांगितली. गावांच्या मदतीस हातभार लागावा असे ठरविले. जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य, बेडशीटस, चादर, शैक्षणिक साहित्य आदी वस्तू आणि देणग्या जमविण्यात येणार आहेत.
दि. ६ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत नवी पेठ येथील हत्ती गणपती मंदिरात मदत स्वीकारली जाईल. वस्तू आणि देणग्या रसिकाश्रय संस्थेकडे जमा होणार असून संस्थेतर्फ पोचपावती मिळेल. देणगीदारांना ८० जीअंतर्गत आयकर सूट मिळेल, असे मानकर यांनी सांगितले. याखेरीज हत्ती गणपती मंडळ ५० हजार रुपयांचे धान्य पूरग्रस्त गावांसाठी देणार आहे.