‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मुंबई | सध्या राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुढील काही काळात मुंबईसह आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. गेल्या काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसंच पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
यंदा पावसाला उशीरा सुरुवात झाली असली तरी आता कोकण किनारपट्टी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात तुफान पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसंच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास 20 ते 30 मिनिटं उशीराने सुरु आहेत. तसंच वाशी, बेलापूर, खारघर, पनवेल परिसरात धुवांधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली जाऊ लागले आहेत. वाढत्या पावसामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तसःच मुंबईतदेखील पावसाने जोर धरला आहे. त्यात मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरातील बऱ्याच भागात पाऊस पुन्हा जोमात सक्रिय होणार अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने नुकतीच दिली आहे. या माहितीनुसार मुंबई परिसरासह कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.