विधवा प्रथा बंदीचा हेरवाड पॅटर्न साताऱ्यात; चळवळीला गती
![विधवा प्रथा बंदीचा हेरवाड पॅटर्न साताऱ्यात; चळवळीला गती WIDPW](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/WIDPW.jpg)
सातारा : काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड (ता. शिरोळ) येथील गावसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव काल सातारा जिल्ह्यातल्या तांबव्यात घेण्यात आला. विधवा प्रथा बंद करण्याचा शासनाने अध्यादेश काढल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पहिला ठराव झाल्याने तांबवेकरांचा विशेष करण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेत हा ठराव घेण्यात आला आहे.
गावचे उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील यांनी हा ठराव मांडला. त्यावर चर्चा होऊन ठरावाला सदस्या जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो ठराव एकमताने मंजूरही करण्यात आला.
या ठरावात म्हटले आहे, की आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी, पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे सामाजिक, धार्मिक, कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. विधवा प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. आपल्या गावामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात येईल. या सर्व बाबींना लक्षात घेऊन सभेने विधवा प्रथा बंदीला मंजुरी दिली.