“मशालीच्या आगीत गद्दार भस्मसात होतील…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

अमरावती | Ambadas Danve On Shinde Group – निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह आणि नावं देण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेनं (Shivsena) तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. जनतेनं मशाल या चिन्हाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे. हे चिन्ह आता घराघरात पोहचलं आहे. या मशालीच्या आगीत सारे गद्दार भस्मसात होतील. या गद्दारांना लोकच धडा शिकवतील, अशी टीका अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर (Shinde Group) केली आहे.
सध्या अंबादास दानवे मेळघाटच्या दौऱ्यावर असून त्यांनी मेळघाटीतील धारणी येथे कुपोषण आणि बालमृत्यूंचा आढावा घेतला. त्यांनी काही कुपोषित बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा देखील केली. त्यानंतर दानवेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, शिवसेना कुणीही संपवू शकत नाही. पक्षचिन्ह गोठवलं म्हणजे पक्ष संपत नसतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना तेजाने तळपतच राहणार आहे. मशाल हे चिन्ह आत्ताच घरोघरी पोहचले आहे. आमची चिंता विरोधकांनी करू नये, लोकच आता या गद्दारांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
पुढे दानवे म्हणाले, कुपोषणाचा विषय गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुपोषणाला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. प्रशासकीय यंत्रणेनं ठरवलं, तर या भागात उत्तम काम होऊ शकते. प्रशासकीय यंत्रणा प्रतिसाद देत नाहीत, अशा आदिवासी बांधवांच्या तक्रारी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत, असंही अंबादास दानवे म्हणाले.