आमचं हिंदुत्व घर पेटणारं नाही तर; चुल पेटवणारं आहे : उद्धव ठाकरे
आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे

मुंबई : मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केले तर, तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. जी गाढवे आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, घंटाधारी नाही. आम्ही गाढवाला सोडून दिले,आमचं हिंदुत्व घर पेटणारं नाही तर; चुल पेटवणारं आहे असे म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हल्ली खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मी मध्ये बोललो होतो की आमचं हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. ते म्हणाले मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आपण पुढे जातोय.
तुम्हाला मुंबई फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे. ज्या ज्या वेळा मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते पहिल्यांदा धावून जातात. कोणतीही आपत्ती येऊ द्या. तो इतरांना मदत करत असतो. रक्तदान करण्यासाठीही अंगात मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.