ताज्या बातम्यापुणे

कांदा दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, केळी तसेच मका दर काय आहेत?

देशात कापूस टिकून

वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.३५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे एमसीएक्सवर ५७ हजार ७५० रुपये प्रतिखंडीवर होते. स्पाॅट मार्केटमध्ये कापसाचा भाव मात्र काहीसा स्थिर दिसत आहे. एमसीएक्सच्या राजकोट डिलेव्हरी केंद्रावर आज कापसाला ५८ हजार १५० रुपये प्रतिखंडीचा भाव मिळाला. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भावात सुधारणा

कांद्याची बाजारातील आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा दिसत आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये दोन दिवसात कांद्याच्या भावात क्विंटलमागे पुन्हा १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. राज्यातील बाजारात कांद्याला आज प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. काही बाजारात सरासरी भाव ३ हजार ८०० रुपयांवर पोचला. पण हा भाव सर्वच बाजारांमध्ये मिळाला नाही. बाजारातील कांद्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किरकोळ चढ उतार वगळता कांद्याचे भाव कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली.

केळीचे भाव टिकून

श्रावण महिना आणि उपवास यामुळे सध्या केळीला चांगली मागणी आहे. तसेच पुढील काळात गणपतीमुळेही केळाला उठाल राहणार आहे. पण सध्याची बाजारातील केळी आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. तसेच पुढील काही आठवड्यांमध्ये केळीची आवक वाढण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे केळीच्या दराला चांगला आधार मिळत आहे. सध्या केळीला सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढच्या काळातही केळीचा उठाव कायम राहू शकतो. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याचा उठाव कायम

देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. यंदा मक्याला इथेनाॅल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे. तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे. परिणामी मक्याचे टिकून आहेत. पण सरकार धोरणांकडे बाजाराचे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये