भारतासाठी ‘करो या मरो’ची ‘कसोटी’; WTC फायनल गाठण्यासाठी चौथा सामना जिंकावाच लागणार!

अहमदाबाद : (IND vs AUS Test Series 2023) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील सध्याच्या मालिकेतील शेवटचा सामना खूपच रंजक असणार आहे. इंदूर कसोटीत 9 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनलमध्ये थेट स्थान मिळवण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल. इंदूरमधील विजयासह ऑस्ट्रेलियाचं अंतिम तिकीट निश्चित झालं होतं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून हा सामना खेळवला जाणार आहे.
चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाल्यास, तसेच सामना अनिर्णित किंवा बरोबरीत संपला तर WTC अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेच्या न्यूझीलंड दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. जर टीम इंडिया हा सामना जिंकू शकली नाही आणि श्रीलंकन संघानं यजमान न्यूझीलंडला 2-0 नं पराभूत केलं तर श्रीलंकेला WTC च्या फायनल्सचं तिकीट मिळेल. पण न्यूझीलंडचा पराभव करणं श्रीलंकेसाठी सोपं नसेल.
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी काही करुन चौथ्या कसोटीत कांगारूंना चीतपट करावं लागणार आहे. तसेच, थेट 3-1 ने कसोटी मालिका आपल्या खिशात घालावी लागेल. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाशी होईल. लंडनमध्ये 7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळावली जाणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात अहमदाबादमध्ये सलग दोन कसोटी सामने खेळले गेले. टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तो तिसरा सामना (डे-नाईट) दोन दिवसांत 10 गडी राखून जिंकला आणि त्यानंतर पुढील कसोटी तीन दिवसांतच खिशात घातली. ही कसोटी टीम इंडियानं एक डाव आणि 25 धावांनी जिंकली. म्हणजेच, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले गेलेले गेले दोन कसोटी सामने टीम इंडियासाठी उत्तम होते.