बांगलादेशाने टिम इंडियाला 314 धावांवर रोखले, अन् ऋषभ पंत- श्रेयस अय्यरचे शतकही हुकले!
![बांगलादेशाने टिम इंडियाला 314 धावांवर रोखले, अन् ऋषभ पंत- श्रेयस अय्यरचे शतकही हुकले! Pant And Iyer](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/12/Pant-And-Iyer--780x470.jpg)
ढाका : (India vs Bangladesh 2nd Test Match 2022) भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली.
भारताने दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव बिनबाद 19 धावांपासून पुढे सुरू केला. मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने आधी केएल राहुलला 10 धावांवर त्यानंतर शुभमन गिलला 20 धावांवर पायचीत बाद करत भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिला सेशन खेळून काढण्याच्या इराद्याने भागादारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताला 73 धावांवर पोहचवले असतानाच तैजुलने ही जोडी फोडली. त्याने पुजाराला 24 धावांवर बाद केले.
यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. मात्र दोन्ही खेळाडूंचे शतक हुकले. पंतने 105 चेंडूत 93 तर अय्यरने 105 चेंडूत 87 धावा केल्या. या दोघांनी भारताची धावसंख्या 94/4 वरून 253/5 पर्यंत नेली. मात्र, पंत बाद होताच भारताचा डाव गडगडला. भारताने शेवटच्या सहा विकेट 62 धावांत गमावल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.