मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दैना

रस्ता खचला; अपघातसदृश स्थिती
पुणे : उंड्री-पिसोळीतील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चेंबर ओव्हरफ्लो झाले आहेत. काही चेंबर तुटले आहेत, त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पावसाच्या पाण्यात वाहत आहे. पालिका प्रशासनाने चेंबरची स्वच्छता करून तुटलेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक माया कामठे, मनीषा कड, अलका टकले यांनी केली. आणि एकूणच या परिसरातील अवस्था चर्चेचा विषय ठरली.
खड्डे आणि वाहतूक कोंडी ही शहरातील विविध भागातील गंभीर समस्या आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही, सायंकाळी घरी यायला उशीर होत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांची आहे. येथील दुरूस्ती काम जरी युद्धपातळीवर सुरू असले तरी ते कायमस्वरुपी होत नसल्याची ओरड स्थानिक करत आहेत.
या भागातील होलेवस्ती चौक ते संस्कृती स्कूल, अतूरनगर-स्मशानभूमी रस्त्यावरील डांबर वाहून गेले, तर भिंताडेनगर-संस्कृती स्कूल दरम्यानचा अर्धा रस्ता खचला असल्याने अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अक्षरक्ष: या रस्त्यावरून स्कूल बस, पाण्याचे टँकर आणि इतरही वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे रस्त्यावर असंख्य खड्डे तर पडले आहेत, तसेच वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
पालिका प्रशासनाकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ही परिस्थिती ओढवल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. येथे एकूण १७ शाळा आहेत. शाळा सुटण्याच्या वेळी स्कूलबसची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूककोंडी होते. त्यामुळे मुले घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागतो, अशी भावना उंड्रीतील स्थानिक पालक शीतल गायकवाड यांनी व्यक्त केली.
मागिल तीन दिवसांपासून जोरदार पावसामुळे सर्वच रस्ते उखडले आहेत. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता नरेश शिंगटे म्हणाले.