पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
![पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा RS7824 ThinkstockPhotos 506316644 hig 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/RS7824_ThinkstockPhotos-506316644-hig-1-780x470.jpg)
पुणे : उद्याच्या अर्थकारणाला पर्यावरणाची झालर असेल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनच उत्पादन, वस्तू, सेवा, विनिमय यावरील अर्थकारण फिरेल असे महत्त्वपूर्ण मत व्यक्त करून उद्या पर्यावरणपूरक अर्थकारणनीती आखणे काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ आणि समुचित एन्व्हायरो टेकच्या कार्यकारी संचालिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी मांडले.
‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मुंबई आणि एन्व्हार्न्मेन्टल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नवलमल फिरोदिया हॉलमध्ये आयोजित एकदिवसीय पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांच्या हस्ते झाले. ‘चॅलेंजेस ऑफ एन्व्हार्न्मेन्ट प्रोटेक्शन इन स्मार्टइंडिया’ या विषयावर ही कार्यशाळा होती.
डॉ. प्रियदर्शनी कर्वे म्हणाल्या, पर्यावरणाला हानी पोहोचवून कोणताही, उद्योग व्यवसाय उभा राहू शकत नाही. पर्यावरणीय धोरणांबाबत आपण आत्ता बदल केला नाही, तर ती धोरणे बदलण्यास पर्यावरणच आपल्याला भाग पाडेल. पर्यावरणपूरक जीवनशैली ही पर्यायी जीवनशैली न मानता ती मुख्य प्रवाहातील जीवनशैली होणे आवश्यक आहे.
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण हा केवळ सरकारचा प्रश्न उरला नसून, तो सर्वांच्याच अस्तित्वाशी संबंधित आहे. पुण्याचा विचार केला असता कचरा व्यवस्थापन फार मोठे आव्हान आहे.
पुण्यात रोज बावीसशे टन कचरा निर्माण होतो. हा केवळ आकडा नसून, पुणेकरांना प्रत्यक्ष कचरा प्रकल्पावर नेऊन ते कचर्याचे डोंगर दाखवणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून कौटुंबिक पातळीवर कचर्याच्या नियोजना संदर्भात जागृती निर्माण होण्यास मदत होऊ शकेल