शिंदेसाहेब भाजपमध्ये जाणार हे म्हणणाऱ्या भाजपाची तेवढी लायकी आहे का?
![शिंदेसाहेब भाजपमध्ये जाणार हे म्हणणाऱ्या भाजपाची तेवढी लायकी आहे का? deepali sayed and devendra fadanvis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/deepali-sayed-and-devendra-fadanvis-780x470.jpg)
मुंबई | Deepali Sayed On Bjp – काल विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेच्या 12 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरातला गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला दिसत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, माननीय एकनाथ शिंदे साहेब भाजपात जाणार म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मीडियावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत त्याबाबत सांगताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे मात्र अजून सविस्तर बोलणं झालेलं नाही. एकनाथ शिंदे आणि आमचे काही आमदार सुरत मध्ये आहेत. आमचा त्यांच्याशी संपर्क सुरूच आहेत. त्यांच्यातील अनेकजण परत येऊ इच्छितात मात्र त्यांना परत येऊ दिलं जात नाहीये. त्यासाठी सात प्रकारची सुरक्षा त्यांच्यासाठी लावली आहे. असा प्रकार फक्त गुजरात मध्येच होऊ शकतो. आत्ताच यासंदर्भात माहिती देणं योग्य राहणार नाही. मला विश्वास आहे सगळं काही ठीक होईल.