सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रपट ’जनहित में जारी’
![सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रपट ’जनहित में जारी’ janhit men jari](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/janhit-men-jari-780x470.jpg)
पुणे – Pune News | चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम तर असतातच पण चित्रपटांनी सामाजिक बांधिलकीदेखील जपावी. समाजातील प्रत्येक घटकावर सगळ्यात जास्त परिणाम हा चित्रपटांचा त्यामुळे मनोरंजनासोबतच आपण समाजाला काहीतरी देण्यासाठी कटिबद्ध आहोत हाच विचार मनात ठेवून ‘जनहित में जारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोकांनी माझ्या कामाला पसंती दिली : नुसरत भरुचा
अलीकडच्या काळात नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नायिकांचे चित्रपटदेखील शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. माझ्या चित्रपटातील कामाला लोकांनी पसंती दिली आहे. माझ्या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि यापुढेही उत्तमोत्तम चित्रपट करून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण लोकांनी आपल्या कामाचे कौतुक केल्यानंतर आपलीही जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि त्याचे भान ठेवूनच मी अधिकाधिक चांगले चित्रपट करणार आहे.
प्यार का पंचनामा, सोनू के टिट्टू की शादी, छलांग, ड्रीमगर्ल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नुसरत भरूचा आता विशाल भानुशाली यांची निर्मिती आणि जय बसंत सिंग यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘जनहित मेें जारी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. यासंदर्भात नुसरतने नुकतीच पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
जनहित में जारी हा चित्रपट खूप मजेशीर आहे. यामध्ये सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. आपल्या समाजात काही गोष्टी अशा असतात, की त्या जनतेच्या हिताच्या असतात. परंतु त्यांच्या त्या लक्षात येत नाहीत. मग याच गोष्टी आपण चित्रपटाच्या माध्यमातून दाखविल्या तर लोकांच्या लक्षात राहतात. मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना दाखविल्या तर लगेच पटतात. या चित्रपटात असाच एक छानसा विषय मांडण्यात आला आहे.