“पंतप्रधानाच्या शर्यतीतल्या महाराष्ट्रातील नेत्याचा भाजपकडूनच अपमान, आम्ही भाजपवर नाराज”: जयंत पाटील
मुंबई – Monsson Session : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात चांगलीच टोलेबाजी होताना दिसली. काल सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत वाद चांगलाच पेटला होता. अक्षरशः धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण गेले होते. त्यांनतर राजकीय वर्तुळात त्या प्रकरणाचा अनेक नेत्यांकडून निषेध देखील करण्यात आला होता. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली.
भाजपने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या महाराष्ट्रातील नेत्याचा अपमान केला असून आम्ही भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचा टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला. जयंत पाटील हे आपल्या भाषणात पंतप्रधानांवर बोलत होते त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान पदावरून फडणवीस यांना चिमटा काढला.
‘महाराष्ट्रातील भाजपचा जो नेता येत्या ८-१० वर्षांत पंतप्रधान पदासाठी सक्षम आहे, अशा नेत्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसवेले त्यामुळे आम्ही नाराज आहोत. महाराष्ट्रातील उगवता नेता… ज्याला आम्ही पंतप्रधानाच्या शर्यतीत मानत होतो. अशा नेत्याला भाजपनं मुख्यमंत्रीपदापासून दूर केलं आहे. भाजपने महाराष्ट्राच्या नेत्याचा अपमान केला आहे’ असा टोला जयंत पाटलांनी लगावला.