महाराष्ट्र

लोक कामावर मत देतात, जातीपातीवर नाही -जितेंद्र आव्हाड

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश देखील राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना दिला आणि आक्रमक हिंदूत्वाचा पुरस्कार केला. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. “मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका.” असंही ते म्हणाले.

“कळवा-मुंब्रा मतदारसंघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान आहेत. त्यात मी कळव्यातून ५७ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३० हजारची आणि आणि मुंब्र्यातून ४५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. लोक कामावर मत देतात, जाती पातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये