“…त्यामुळे मी बाई दिसली की चार हात दूर पळतो”, जितेंद्र आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य

मुंबई | Jitendra Awhad – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार हे कहर असून ते कोणाविरोधात कोणता गुन्हा दाखल करतील आणि कोणाला अर्ध्यारात्री उचलून घेऊन जातील हे सांगता येत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ते नवी मुंबईतील नेरूळ येथे आयोजित आगरी कोळी महोत्सवादरम्यान बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “सध्या राज्यात वाईट परिस्थिती आहे. पोलीस कधी रात्री उचलून घेऊन जातील काही सांगता येत नाही. आपला गुन्हा काय? तर तोही सांगता येत नाही. माझ्यावर काही दिवसांपूर्वीच 72 तासांत दोन गुन्हे दाखल झाले होते. मी गर्दीतून एका बाईला बाजूला केलं तर तिनं माझ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी बाई दिसली की चार हात दूर पळतो. आता मी शपथ घेतली आहे की बायकोला सोडून कोणालाही स्पर्श करायचा नाही. हे सरकार म्हणजे कहर आहे.”
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. “एकनाथ शिंदे हे सीएम नाहीत तर व्हॉईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. हातात कायदा असतानाही व्हॉईसरॉय कोणाचंही ऐकायचा नाही, तसे हे व्हॉईसरॉय आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतं अख्खं ठाणे त्यांच्या हातात असावं. ठाण्यात टिपून टिपून मारतात तसं ते टिपून टिपून मारत आहेत”, अशी खोचक टीका आव्हाडांनी केली.