मैत्र जपावं, मैत्र जगावं
![मैत्र जपावं, मैत्र जगावं Main Page 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Main-Page-1-780x470.jpg)
आंतरिक प्रेमाने मैत्रीला बहर
मैत्रीमध्ये गुंतणं हा व्यक्तिसापेक्ष विचार आहे.
पण यामुळे मैत्रीला दूषणं देण्यात काहीच अर्थ नाही.
ती सुंदरच असते…
चहा-कॉफीनिमित्त भेटल्यानंतर एकदा गप्पांचा फड जमला की, आजूबाजूचा विसर पडतो. त्यावेळी विचार, भावनांचं शेअरिंग होतं. मित्रपरिवार नेहमीच तुमचा आधारस्तंभ असतात. आपण जन्मदात्यांशीही स्पष्टपणे बोलू शकत नाही, अशा अनेक गोष्टी मित्रांबरोबर शेअर केल्या जातात. प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी ते आपल्या सोबत असतात. ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी साजर्या होणार्या मैत्रीदिनानिमित्त हा विशेष लेख. प्रत्येकाचं अस्तित्व आणि आयुष्य स्वतंत्र असलं तरी समाजप्रिय माणूस कधीच एकटा जगू शकत नाही. काही अपवाद वगळले तर विविध नात्यांच्या रूपाने त्याला कोणा ना कोणा सोबत्याची आवश्यकता असते. आयुष्यातल्या प्रत्येक प्रवासात सोबतीसाठी सहप्रवासी शोधण्याची त्याची उपजत वृत्ती असते. सुरुवातीला कुटुंबीयांच्या रूपाने त्याची ही गरज भागते. मात्र वयाचा एक टप्पा ओलांडल्यानंतर मैत्रीची ओळख पटते आणि कदाचित नातलगांपेक्षा हेच नातं अधिक गहिरं, विश्वासू होऊन जातं. ते अधिक हवंहवंसं वाटू लागतं. म्हणूनच वेगवेगळे देश वेगवेगळ्या वेळी मैत्रीदिन साजरा करीत असले तरी त्या साजरीकरणामागील भावना एकसारखीच असते.
मुळात हे एक दिवस साजरं होणारं नातंच नाही. मैत्रीचा महोत्सव दर दिवशी सुरू असतो. प्रत्यक्ष भेट होत नसली तरी नियमित सोबत करणारे हे लोक असतात. रुसवे-फुगवे, भांडणं, मतभिन्नता असली तरी एका क्षणात ते मागे टाकून परस्परांना समजून घेणारे ते जिवलग असतात. म्हणूनच वर्षातला एकच नव्हे तर प्रत्येक दिवस त्यांचा असतो. मित्र-मैत्रिणींचं आपल्या आणि आपलं आयुष्यातलं पदार्पण हीच खरंतर एक वेगळी गोष्ट असते, कारण त्यानंतर आपलं आयुष्यच बदलून जातं. म्हणूनच लग्नाच्या नात्याइतकं महत्त्व मैत्रीलाही आहे, असं वाटतं. लग्नबंधनात अडकल्यानंतर दोघांचा दोन कुटुंबांशी संबंध निर्माण होतो. त्यानिमित्तानं दोन कुटुंबं एकत्र येतात, अगदी त्याचप्रमाणे मैत्रीमुळेही मित्र-मैत्रिणींचे कुटुंबीय परिचित होतात. त्यांची संस्कृती, आचार-विचार, राहण्याच्या पद्धती या सगळ्याची ओळख होते, खाद्यसंस्कृती समजते. एकमेकांच्या घरातल्या स्थितीशी आपण अवगत होतो. वेगवेगळ्या आर्थिक स्थितीची जाण होते. अनेक बर्या-वाईट गोष्टींचा जवळून परिचय होतो. हे सगळं आपण शालेय वयातल्या मैत्रीपासून अनुभवतो. वेगवेगळ्या क्लासेसच्या, क्रियाकलापांच्या निमित्तानं त्या वयापासूनच आपण अनेकांशी जोडले जातो. आपली अनेकांशी ओळख होते.
मात्र प्रत्येक ओळख मैत्रीत रूपांतरित होते असं नाही. त्यातल्या काहींशीच सूर जुळतात आणि मैत्रीच्या प्रेमळ बंधनात गुंफले जातात. पुढल्या काळात दररोज भेटीगाठी झाल्या नाहीत तरी मैत्री मात्र अभंग राहते. सुदैवाने मला असे अनेक मैत्र-मैत्रिणी मिळाले याचा मनापासून आनंद आहे. माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे. कधीही कोणाकडे जावं, ऐसपैस गप्पा माराव्यात, न कळवता जाऊनही त्यांच्याकडे जेवावं, आपल्या घरात वावरतो तितक्या सहजतेने वावरावं अशी अनेक घरं माझ्याकडे आहेत. आज या विश्वात व्यग्र असले तरी आम्ही शाळेतलं मैत्रही जपलं आहे. खरं सांगायचं तर सतत एकमेकींच्या संपर्कात राहण्याची गरज बदलली आहे. आता व्हॉट्सॲपच्या निमित्ताने एक ग्रुप तयार होत असला तरी त्यावर सगळ्याजणी बोलू शकतात असं नाही. बरेच दिवस फोनही होत नाहीत. आम्ही नियमितपणे भेटतही नाही. पण या कशामुळेही आमच्या मैत्रीमध्ये बाधा येत नाही, कारण मैत्री कधीच या बाह्य बाबींमध्ये अडकत नाही.
मैत्रीमध्ये आतून एक कनेक्शन तयार झालेलं असतं. ते नेहमीच आपल्यासोबत असतं. मी ललित कला केंद्रामध्ये शिकले. तिथे वेगवेगळ्या शहरांमधून लोक आले होते. आम्ही सगळे दोन वर्षं एका ठिकाणी, एका ध्येयानं, एका ऊर्जेनं काम करत होतो. साहजिकच या सोबतीनं अनेकांशी मैत्र जुळलं. एकमेकांच्या सवयींशी परिचित झालो. आमचं एक कुटुंबच तयार झालं. आम्ही एकमेकांच्या जवळचे झालो. त्या वयात सुख-दु:ख जाणून घेणं, मनातल्या भावना व्यक्त करणं, एकमेकांच्या समस्या जाणून जमेल तेवढी मदत करणं गरजेचं असतं. मैत्रीमध्ये ही बाब आपसूक साधली जाते. सध्याचा काळ तणावग्रस्ततेचा आहे. वेगवेगळ्या कारणानं प्रत्येकजण तणाव अनुभवतो, पण तो व्यक्त करू शकत नाही. अशावेळी कोंडमारा सहन करावा लागतो. पण मित्रांना ही स्थिती न सांगताही समजते. तणावातून बाहेर पडण्याचे मार्ग सुचवतात आणि त्यासाठी पुढाकार घेतात.
–अनिता दाते
प्रसिद्ध अभिनेत्री