श्री खंडोबा मंदिरात ३० डिंसेबरला सोमवती सोहळा

लोणी-धामणी : धामणी (ता. आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात मार्गशिर्ष कृष्ण पक्ष सोमवती (दि. ३०) अमावस्येला सोमवारी खंडोबाच्या पंचधातुच्या मुखवट्याला शाहीस्नान तसेच पालखीची वाजतगाजत मिरवणूक व मंदिरात दर्शनासाठी येणार्या सर्व भाविकांसाठी #महाप्रसादाचे (Mahaprasad) आयोजन केल्याची माहीती देवस्थानच्या वतीने प्रकाश जाधव पाटील, ग्रामस्थ आणि देवस्थानाच्या सेवेकर्यांनी दिली. पंचागानुसार मार्गशिर्ष महिन्यातील तिसरी आणि शेवटची सोमवती ३० तारखेला पहाटे ४ वाजून १ मिनिटाने या उगवती अमावस्येला सुरुवात होत असून, या सोमवतीचा कार्यकाळ मंगळवारी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटापर्यंत असून, सोमवारी संपूर्ण दिवसभर सोमवतीचा कार्यकाल आहे.
सोमवतीच्या या पवित्र दिवशी कुलदैवत खंडेरायाच्या (Khandoba) मुखवट्याच्या शाहीस्नानात पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर भाविकांच्या कष्टाला मुक्ती मिळते. प्रापंचीक अडचणी कमी होतात व सोमवती अन्नदान सोहळ्यात निर्मळ मनाने व निष्ठेने सहभागी झाले तर आपला पितृदोष जाऊन दैनंदिन कार्यकाळात यश प्राप्त होते, अशी भाविकांची निस्सीम श्रध्दा असल्याचे वेदशास्रसंपन्न वामनराव बाळकृष्ण मरकळे गुरुजी आळंदीकर यांनी सांगितले.
सोमवतीला सोमवारी खंडोबा म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्याला
शाहीस्नान घालण्यासाठी व पालखी महाप्रसाद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे (Pune), नगर (Nagar), नाशिक जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित राहतात असे सेवेकरी मंडळीनी सांगितले. सोमवतीच्या दिवशी पहाटे मुख्य मंदिरात खंडोबाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिरातून खंडोबा, म्हाळसाई व बाणाईचे पंचधातूचे सर्वांगसुंदर मुखवटे वाजत गाजत देवमळ्यातील विहीरीवर आणण्यात येतात व त्या ठिकाणी सोमवतीच्या पुण्यस्थानाच्या ओट्यावर मुखवट्यांना शाहीस्नान पारंपारिक पूजा व महाआरती करण्यात येते. त्यानंतर देवाचे काठीचे मानकरी, सेवेकरी, खांदेकरी व नगर, नाशिक(Nashik) व पुणे जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या कुळांचा व उपस्थित सर्व भाविक, ग्रामस्थ व महिला यांचा देवस्थानाचे वतीने मानपान करण्यात येतो. सोमवतीच्या शाहीस्नान, पालखी मिरवणूक व महाप्रसाद कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थ व देवाचे सेवेकरी मंडळीनी केले आहे.