डॉक्टर तुम्हीसुद्धा! रुबी हॉल ‘क्लिनिक’मध्ये किडनी रॅकेटचा पर्दाफाश
![डॉक्टर तुम्हीसुद्धा! रुबी हॉल ‘क्लिनिक’मध्ये किडनी रॅकेटचा पर्दाफाश expos001](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/expos001-780x470.jpg)
पुणे : गेल्या महिन्यात पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या आठच दिवसांत एका महिलेचे किडनी रॅकेट प्रकरण पुढे आले. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करीत तपास जोमाने सुरू केला आणि गुरुवारी अवघ्या पंधरा दिवसांतच पोलिसांनी किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला. रुबी हॉलच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्यांसह तब्बल पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून किडनी रॅकेट एजंटांचे धाबे दणाणले आहेत.
प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनीतस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. परवेझ ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल
ऑगस्ट २०१९ चे मार्च २०२२ या काळात ग्रँट मेडिकल फाउंडेशन रुबी हॉल हॉस्पिटल या ठिकाणी आरोपी अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, रवी गायकवाड आणि अभिजित मदने यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे त्यांनी ग्रँड मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी सादर केली. या कागदपत्रांची सखोल तपासणी न करता आरोपी रेबिका जॉन, मंजूषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ. भूपत भाटे, डॉ. हिमेश गांधी, सुरेखा जोशी यांनी ही कागदपत्रे रीजनल ऑथोरायझेशन कमिटीकडे पाठवली.
या प्रकरणात विनाकारण गोवले जात आहे. केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांना योग्य सहकार्य करण्याची जबाबदारी क्लिनिकच्या सर्व टीमची असणार आहे. लवकरच सत्य बाहेर येईल. टीमच्या सदस्यांनी घाबरून जाऊ नये.
_डॉ. परवेझ ग्रँट, मुख्य मॅनेजिंग ट्रस्टी, रुबी हॉल क्लिनिक
रिजनल ऑथरायझेशन कमिटी, बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालयाची त्यांनी दिशाभूल करून त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ चे कलम १० चे उल्लंघन केले. हा सर्व प्रकार रुबी हॉल क्लिनिक येथे घडला. या सर्व प्रकाराला रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रँटदेखील मॅनेजिंग ट्रस्टी या नात्याने तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महिलेच्या किडनी प्रकरणात पोलिसांनी जास्त लक्ष दिले. किडनी रॅॅकेटमध्ये गुंतलेल्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी केली जाणार आहे. यामध्ये आढळणार्या दोषींवर कडक कारवाई करून अटक केली जाईल. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याची दक्षता पुढे घेतली जाईल.
_विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे
शिक्षण विभागाची चौकशी समिती कागदावरच…
रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी प्रत्यारोपण झालेल्या प्रकरणात पैशासाठी किडनी दिल्याचे समोर आले. त्यातून किडनी रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यासंदर्भात आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी समिती स्थापन केली. या प्रकरणात नेमके काय झाले, याचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने जे. जे. कॉलेजच्या डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्या ससून रुग्णालयाची चौकशी केली. त्या चौकशीचा गोपनीय अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आला. मात्र, पुढे या समितीचे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे. ही समिती केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश….
रुबी हॉलमध्ये झालेल्या किडनी तस्करीप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, पुढील आठ दिवसांमध्ये या चौकशीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीच्या अहवालात हे सत्य समोर येईल. त्यानंतर दोषींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाणार असून, हे केवळ एक प्रकरण आहे की यापूर्वीही अशी प्रकरणे घडली आहेत, याचीही माहिती घेतली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांवर केली होती कारवाई…
पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण फसवणूकप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी यासंबंधीचे आदेश काढले होते. तावरे हे विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. तर महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली होती. आता याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवयव प्रत्यारोपणाचा परवाना निलंबित…
रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयाला किडनी रॅकेट प्रकरण चांगलेच भोवले आहे. राज्यशासनाच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणाचे चौकशी आदेश दिले आहेत. यासोबतच या प्रकरणाचा अंतिम अहवाल येईपर्यंत रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यामध्ये रुबी हॉलमधील संबंधितांची चौकशीही करण्यात आली असून त्याच्या अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल येईपर्यंत रुबी हॉलची अवयव प्रत्यारोपणाची मान्यता काढून घेत आहे, असे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने एक विशेष पत्रक काढून दिले.