अजबच ! ॲम्ब्युलन्सचा गरब्यासाठी वापर अन् दोन वाहनाचा अपघात, पुढे जे झालं ते वाचून तुम्हीही व्हाल हैराण …

Kolhapur news :
कोल्हापुरातील भावी डॉक्टरांनी गरबा खेळण्यासाठी वेगळाच प्रकार केल्याचं समोर आलंय. गरबा खेळण्यासाठी जायला भावी डॉक्टर मुलींनी ॲम्ब्युलन्स वापरली. ॲम्ब्युलन्सने या २ दुचाकींना धडक देखील दिली आहे. विशेष म्हणजे ही ॲम्ब्युलन्स शासकीय रुग्णालयाची असल्याचं समोर आलं आहे.
हा सर्व प्रकार रविवार रात्री दहाच्या सुमारास कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात घडला. रुग्णांसाठी असलेली ॲम्ब्युलन्स गरबा खेळण्यासाठी जायला वापरल्याने नागरिक अत्यंत संतप्त झाले. कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींनी गरबा खेळण्यासाठी जायला चक्क सीपीआर रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स वापरली. कार्यक्रमात लवकर पोहोचण्यासाठी ॲम्ब्युलन्स घेतली आणि सायरन वाजवत भरधाव पळवली.
दरम्यान या ॲम्ब्युलन्सने एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले. त्यानंतर पुढील गाडीला धडक दिली. यावेळी काही नागरिकांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला, त्यावेळी चालकाशेजारी दोन मुली बसल्याचे लक्षात आलं.नागरिकांनी ही ॲम्ब्युलन्स थांबवत मागचे दार उघडण्यास सांगितले. सुरुवातीला चालकाने नकार दिला. मात्र नागरिकांनी दबाव टाकल्यानंतर त्याने दरवाजा उघडला.
यावेळी रुग्णवाहिकेत गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी दाटीवाटीने बसल्याचे दिसून आलं. ॲम्ब्युलन्समधील मुलींकडे अधिक चौकशी केली असता गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित नागरिकांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली असता जुना राजवाडा पोलिसांचे गस्ती पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाच्या परवाना तपासून ॲम्ब्युलन्स सोडून दिली. रुग्णवाहिकेचा वापर गरबा खेळायला जाण्यासाठी केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेच्या चौकशीची संभाजी ब्रिगेडची मागणी केली.