संगमवाडीत लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामास प्रारंभ; स्मारकाच्या भूसंपादन कामासाठी तब्बल ८८ कोटी

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाच्या सीमा भिंत रस्ता, जमीन लेव्हलिंग, साफसफाई, सुरक्षा व्यवस्था या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच माजी गृहराज्यमंत्री व मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांच्या हस्ते पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. या वेळी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासन अध्यक्ष विजय डाकले यांनी आयोजन केले होते.
गेली अनेक दशके समाजाने व लहुप्रेमींनी खूप संघर्षकरून, प्रयत्नकरूनसुद्धा या समाधिस्थळाच्या कामाचा निर्णय होऊ शकला नव्हता. पण अजित पवार यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे महाविकास आघाडी सरकार असताना हा निर्णय झाला. विजय डाकले यांसारख्या कार्यक्षम आणि समाजहित जपणाऱ्या कार्यकर्त्याची समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी सहकारी सदस्यासह सरकार दरबारी प्रचंड पाठपुरावा केला. निधी आणला, जागा संपादीत करून घेतली याबरोबरच संबंधित इतर कामे व्हावीत म्हणून सतत कामाचा धडाका लावला. महाविकास आघाडी सरकारने स्मारकाच्या भूसंपादन कामासाठी तब्बल ८८ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेस वर्ग देखील केले. भूसंपादन झाल्यामुळेच हे भूमिपूजन होऊ शकले, असे विजय डाकले म्हणाले.
या सर्व बाबींची माझ्या मातंग समाजातील समाजबांधव, तसेच आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेप्रेमी कायम नोंद ठेवतील, याची मला खात्री आहे. या प्रसंगी समिती सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, राम कसबे, डॅा. राजू आडागळे, शांतीलाल मिसाळ, अनिल हातागळे, राजू साने, आरपीआय युवक अध्यक्ष विरेन हनुमंत साठे, सचिन डाकले, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.